Headlines

ऑनलाइन गेमचा नाद पडला भारी!:तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अपहरण, उत्तर प्रदेशात नेत केले अत्याचार




ऑनलाइन गेमच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी वाढणारी जवळीक अल्पवयीन मुलांसाठी किती धोकादायक ठरू शकते, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली आहे. ‘फ्री फायर’ या मोबाईल गेमच्या माध्यमातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि फूस लावून उत्तर प्रदेशात पळवून नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई करत मुलीची सुखरूप सुटका केली असून, सुरजकुमार राजपूत या आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 31 ऑगस्ट रोजी मुलीच्या आईने बेलतरोडी पोलिस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता असल्याची आणि तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली होती. पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय मूळचे मध्य प्रदेशातील असून, ते कामानिमित्त नागपुरात वास्तव्यास आहेत. ही मुलगी मध्य प्रदेशातील शिवनी येथे शिक्षण घेत होती. ती नागपुरात आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती, मात्र ती शिवनीला परतलीच नाही, अशी माहिती तिच्या आईने पोलिसांना दिली. तांत्रिक तपासाला वेग तक्रार दाखल होताच बेलतरोडी पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक तपासावर भर दिला असता, मुलीला तिच्या एका मित्राकडून पैसे पाठवण्यात आल्याची महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली. याच माहितीच्या आधारे तपासाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली आणि आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तातडीने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आली. उत्तर प्रदेशातून सुखरूप सुटका पोलिस आपल्या मागावर असल्याची कुणकूण लागताच आरोपीने वारंवार ठिकाणे बदलून तपास यंत्रणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यात धडक कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली. सीतापूरचाच रहिवासी असलेल्या आरोपी सुरजकुमार राजपूत यालाही ताब्यात घेऊन नागपुरात आणण्यात आले. वैद्यकीय तपासणीत मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पालकांना पोलिसांचे आवाहन ऑनलाइन गेम आणि सोशल मीडियामुळे मुलांची अनोळखी लोकांशी वाढणारी मैत्री ही पालकांसाठी मोठी चिंतेची बाब बनली आहे. या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र नाईकवाड यांनी पालकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुलांच्या हाती मोबाईल किंवा लॅपटॉप दिल्यानंतर ते नेमके काय पाहतात, कोणते गेम खेळतात आणि ऑनलाइन कोणाच्या संपर्कात आहेत, यावर पालकांनी बारीक लक्ष ठेवावे आणि त्यांच्याशी सतत मोकळा संवाद साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *