![]()
पुण्याजवळील राजगुरुनगर परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. 20 वर्षीय भाच्याने आजारी मामाची घरातच हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. माधवनगर येथे शनिवारी (19 सप्टेंबर) ही घटना घडली. संदीप वामन गडदे (43) असे मृत मामाचे नाव असून प्रवीण कैलास कोहिनकर (20) असे आत्महत्या केलेल्या भाच्याचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या तपासात हत्येमागील प्राथमिक कारण समोर आले आहे. आजारपणामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप गडदे हे अविवाहित होते. काही दिवसांपूर्वी त्यांना पॅरालिसिसचा झटका आला होता. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ते उपचार आणि देखभालीसाठी त्यांच्या बहिणीच्या, म्हणजेच प्रवीणच्या आईच्या घरी राहत होते. आजारपणामुळे संदीप यांच्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं. रात्री-अपरात्री त्यांच्याकडून मोठ्याने आरडाओरड होत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झालं होतं. गेल्या काही काळापासून या परिस्थितीचा प्रवीणवरही परिणाम होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. सुसाईड नोटमधून मामाच्या त्रासाचा उल्लेख घटनेनंतर पोलिसांना प्रवीणने लिहिलेली चिठ्ठी मिळाली. त्यामध्ये मामाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत असल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे मामाच्या आजारपणामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे प्रवीणने हा निर्णय घेतला असावा, अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, केवळ हेच कारण होतं का? यामागे आणखी काही कौटुंबिक वाद किंवा इतर कारण होतं , याचाही पोलीस तपास करत आहेत. आईला कामासाठी सोडलं आणि घरी परतला शनिवारी सकाळी प्रवीणने आपल्या आईला कामानिमित्त खेड तालुक्यातील वाकी येथे सोडलं. त्यानंतर आधारकार्ड घरी राहिल्याचं सांगून तो पुन्हा माधवनगर येथील घरी परतला. घरी आल्यानंतर तो मामाच्या खोलीत गेला आणि खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. यानंतर त्याने मामावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात संदीप गडदे यांचा मृत्यू झाला. मामाच्या हत्येनंतर प्रवीणनेही आत्महत्या केली मामाची हत्या केल्यानंतर प्रवीणने त्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने ही घटना लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच खेड पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.या प्रकरणी खेड पोलिसांनी प्रवीणविरुद्ध खुनाचा आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सुसाईड नोटसह घटनास्थळावरील इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे. नेमकं कारण काय? पोलीस तपास सुरू सध्या पोलिसांच्या तपासात मामाच्या आजारपणामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावामुळे प्रवीणने हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक शक्यता समोर आली आहे. मात्र, हत्येमागे आणखी काही कारण होतं का, दोघांमध्ये पूर्वी काही वाद झाले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे राजगुरुनगर आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा… सरपंच संतोष देशमुख हत्याकांड:फॉरेन्सिक पुराव्यांची साखळी बिनचूक असल्याचा सरकारी पक्षाचा दावा, पुराव्यांच्या सुरक्षेवर कोर्टात जोरदार युक्तिवाद; 30 सप्टेंबर निर्णायक संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोग (जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता न्यायालयीन प्रक्रियेने वेग घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने जप्त पुराव्यांची सुरक्षितता दर्शवणारी ‘चेन ऑफ कस्टडी’ (Chain of Custody) कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे वैध असल्याचा भक्कम युक्तिवाद न्यायालयात मांडला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या खटल्याची पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित केले आहे. सविस्तर वाचा…
Source link
आधी मामाची हत्या, नंतर भाच्यानेही जीवन संपवलं:‘मामाकडून त्रास’च्या उल्लेखाने प्रकरणाला वेगळं वळण, पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर?