![]()
अमरावती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रलंबित ऑनलाइन आणि इतर कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ स्तरावरून ऑनलाइन कामांमध्ये दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत, म्हणजेच २४ सप्टेंबरपर्यंत, या कामांचा अहवाल मागवण्यात आला आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांनुसार, सहावी ते बारावीपर्यंत वर्ग असलेल्या शाळांनी ‘इन्स्पायर अवॉर्ड’साठी लगेच नोंदणी करावी. तसेच, ‘अमृत वृक्ष ॲप’वर ‘नशामुक्त शाळा’ आणि ‘इको क्लब’ची नोंदणी पूर्ण करण्यास सांगितले आहे. ‘युडायस स्टुडंट्स मॉड्युल’मध्ये आधार पडताळणी, अपार आयडी, एमबीयू आणि स्टुडंट प्रोफाइलमधील बाकीची कामे पूर्ण करून ‘ड्रॉपबॉक्स’मधील संख्या शून्य करण्याचे निर्देश दिले आहेत. यासोबतच, शाळेच्या भौतिक सुविधांची माहिती लगेच अपडेट करण्यास सांगितले आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधून आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्याचे निर्देश आहेत. ‘चला शाळेत जाऊया’ या अभियानांतर्गत शाळांची स्वच्छता, गुणवत्ता आणि इतर भौतिक सुविधांची तपासणी केली जाईल आणि त्यानुसार कार्यवाही केली जाईल. शालेय पोषण आहाराची कागदपत्रे अद्ययावत ठेवणे, किचन शेड स्वच्छ ठेवणे, धान्य आणि इतर साहित्याची मुदत तपासणे, पूरक आहाराच्या नियमांचे पालन करणे आणि पुरवठादाराकडून आलेला माल तपासणी करूनच स्वीकारणे, असे निर्देश दिले आहेत. मुदत संपलेल्या शालेय पोषण आहाराची विल्हेवाट संबंधित समितीमार्फत करावी, असेही सांगितले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबतच्या सरकारी निर्णयांचे पालन करावे आणि सरल पोर्टलवर विद्यार्थी सुरक्षेची माहिती अपडेट करावी. शाळांनी पिण्याच्या पाण्याची तपासणी स्वतः करून घ्यावी, अशा सूचनाही दिल्या आहेत. तसेच, ‘माझी विद्यार्थी मेळावा’ आयोजित करून त्याची माहिती अपडेट करण्यास सांगितले आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी लगेच करावी, असे निर्देश आहेत. प्रलंबित कामे पूर्ण करण्यास दिरंगाई करणाऱ्या शाळांना नोटीस बजावण्यात येईल, असे पत्रात स्पष्ट केले आहे. सरकारी आणि खासगी अनुदानित शाळांनी ऑनलाइन कामे पुढील दोन दिवसांत पूर्ण करावीत, असेही निर्देश दिले आहेत. शिक्षण आयुक्तांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये (व्हीसी) थेट नाराजी व्यक्त केल्यामुळे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून ठरलेल्या वेळेत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शाळानिहाय आणि उपक्रमनिहाय अंमलबजावणीचा अहवाल २४ सप्टेंबरपर्यंत कार्यालयात सादर करण्यास सांगितले आहे.
Source link
जिल्हा परिषद शिक्षकांना 2 दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आदेश:वरिष्ठ स्तरावरून नाराजीनंतर शाळानिहाय अहवाल मागवला