![]()
नागपूरमध्ये पाच सोलार सेल प्रकल्पांत तब्बल ₹1,04,245.9 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. त्यांची उत्पादन क्षमता 33.5 गिगावॅट असून या माध्यमातून 29 हजार 50 एवढी रोजगार निर्मिती होणार आहे. येत्या दीड-दोन वर्षांत नागपूरच्या औद्योगिक नकाशावर सौर उपकरण निर्मितीचा मोठा पट्टा प्रत्यक्षात आकाराला येईल,असे चित्र आहे. एमआयडीचे प्रादेशिक व्यवस्थापक मनोहर पोटे यांनी दिव्य मराठीला ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त बुटीबोरी येथील अवाडा कंपनीच्या सौर मॉड्यूल निर्मिती प्रकल्पाला भेट दिल्यावर नागपुरात देशातील सर्वात मोठे सोलर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टिम बनवण्याचे आवाहन केले होते. या भेटीनंतर दुसऱ्याच दिवशी नागपूरमधील सौर उद्योगाची संभाव्य व्याप्ती समोर आली आहे.नागपूरमध्ये सौर सेल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमध्ये वारी एनर्जी, पॉवरिन ऊर्जा, अवाडा इलेक्ट्रो, ज्युपिटर इंटरनॅशनल, एसीएमइ क्लीनटेक सोल्युशन्स यांचा समावेश आहे. वारीची प्रस्तावित क्षमता 10 गिगावॅट आहे. पॉवरिनची 7.5 गिगावॅट आहे. ज्युपिटरची 6 गिगावॅट आहे. अवाडा आणि एसीएमइची प्रत्येकी 5 गिगावॅट आहे. म्हणजेच या पाच प्रकल्पांमधून 33.5 गिगावॅट, म्हणजे 3,350 कोटी वॅट क्षमतेचे सौर सेल उत्पादन उभे राहणार आहे. गुंतवणुकीत पॉवरिन ऊर्जा ₹60,299 कोटींसह आघाडीवर आहे. अवाडा इलेक्ट्रोची ₹13,646.9 कोटी गुंतवणूक आहे. वारी एनर्जीची ₹11,500 कोटी गुंतवणूक आहे. ज्युपिटर इंटरनॅशनलची ₹10,800 कोटी गुंतवणूक आहे. आकडे सांगतात काय? सोलार सेल प्रकल्प : 5} एकूण प्रस्तावित गुंतवणूक : ₹1,04,245.9 कोटी } एकूण सौर सेल क्षमता : 33.5 जीडब्ल्यू } 33.5 जीडब्ल्यू म्हणजे : 3,350 कोटी वॅट } एकूण अपेक्षित रोजगार : 29,050} सर्वाधिक क्षमता : वारी एनर्जी- 10 जीडब्ल्यू } सर्वाधिक गुंतवणूक : पॉवरिन ऊर्जा-₹60,299 कोटी सोलार उद्योगासोबत पूरक उद्योगांची साखळी गरजेची सोलार सेल उत्पादक कंपन्यांसोबत गरजेनुसार पूरक उद्योग विकसित करण्यासाठी एमआयडीसी व जिल्हा उद्योग केंद्राने कंपन्या व उद्योजकांची बैठक घडवून आणावी, अशी अपेक्षा आहे. सोलर उद्योगाभोवती उपकरणे, सुटे भाग, पॅकेजिंग, देखभाल, अन्य सेवा देणारे उद्योग उभे राहिल्यास रोजगार वाढेल. यासाठी एमआयडीसीने काही भूखंड पूरक उद्योगांसाठी राखीव ठेवावेत. तसेच बुटीबोरीतील नव्या कौशल्य विकास केंद्रातून सोलार कंपन्यांच्या सहकार्याने आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करता येईल.
शशिकांत कोठारकर, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर असोसिएशन
Source link
नागपूरमध्ये सोलार हब दृष्टिपथात; पाच प्रकल्पांत ₹1.04 लाख कोटींची गुंतवणूक:29 हजार 50 रोजगारांची निर्मिती, दीड-दोन वर्षांत मोठी उत्पादन क्षमता प्रत्यक्षात येणार