![]()
मुंबईच्या भाईंदर येथील तपोवन विद्यालयामध्ये एका विद्यार्थ्याने जेवणाच्या डब्यात मेथीची भाजी आणल्याबद्दल शाळेने त्याच्याकडून 50 रुपये दंड आकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘पर्युषण पर्व 2026’ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आहारावर अशा प्रकारचे निर्बंध लादले गेल्याने सध्या या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी रॉबर्ट डिसोझा यांनी पालिकेकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, या शाळेत बहुतांश विद्यार्थी जैन समाजातील असल्याने, प्रवेशाच्या वेळीच पालकांना मुलांच्या डब्यात मांसाहारी पदार्थ किंवा कंदमुळे न देण्याच्या सक्त सूचना दिल्या जातात. याच नियमांच्या आडून शाळेने डब्यात मेथीची भाजी आणणाऱ्या विद्यार्थ्यावर ही दंडात्मक कारवाई केली असून, या मनमानी कारभारामुळे पालकांमध्येही तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शिक्षण विभागाची नोटीस या तक्रारीची गंभीर दखल घेत मीरा-भाईंदर महापालिकेच्या शिक्षण विभागाने तपोवन विद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांना डब्यात कोणते अन्नपदार्थ आणावेत यावर निर्बंध लादण्याचा आणि विशिष्ट पदार्थ आणल्यास दंड आकारण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे पालिकेने नोटिशीत म्हटले आहे. अशा प्रकारच्या कृतीमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत अधिकारांसह शिक्षणाच्या अधिकाराशी (आरटीई) संबंधित नियमांचे थेट उल्लंघन होत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शाळेवर कठोर कारवाई करण्याचा इशारा शाळेत मेथीची भाजी आणण्यास मनाई असल्याने, विद्यार्थ्याला कॅन्टीनमधून दुसरी भाजी देण्यासाठी 50 रुपये आकारण्यात आल्याचे स्पष्टीकरण तपोवन विद्यालयाने पालकांना दिलेल्या पत्रात दिले आहे. या प्रकाराविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी रॉबर्ट डिसोझा यांनी तक्रार केल्यानंतर, शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी 18 सप्टेंबर रोजी शाळेला नोटीस बजावली. आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर असे जाचक नियम लादता येत नाहीत. यावर समाधानकारक खुलासा न केल्यास शाळेवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे. शाळेला अल्पसंख्याक दर्जा तपोवन विद्यालयाची अल्पसंख्याक शाळा म्हणून नोंदणी आहे. अल्पसंख्याक दर्जा असल्यामुळे शाळेला आपल्या आवश्यकतेनुसार काही नियम तयार करण्याचा अधिकार निश्चितच आहे. मात्र, या अधिकाराचा आधार घेत विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे दंड किंवा कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही, असा ठाम दावा मनसेचे शहराध्यक्ष रॉबर्ट डिसोझा यांनी शिक्षण विभागाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. मीरा-भाईंदरमध्ये यापूर्वीही अशा घटना मीरा-भाईंदरमध्ये असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मीरा रोड येथील एका शाळेने पर्युषण पर्वाच्या काळात डब्यात कांदा, लसूण आणि काही विशिष्ट खाद्यपदार्थ आणू नयेत, अशा सूचना दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळीही शिक्षण विभागाने नोटीस बजावल्यानंतर शाळेला ते परिपत्रक मागे घ्यावे लागले होते. तपोवन विद्यालयाच्या व्यवस्थापनाची या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे आता शिक्षण विभाग या शाळेवर नेमकी काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
शाळेत मेथीची भाजी नेल्याने विद्यार्थ्याला दंड!:मीरा भाईंदर येथील शाळेतला प्रकार; शिक्षण विभागाकडून कारणे दाखवा नोटीस