Headlines

CSMT रेल्वे पोलिसांच्या कोठडीत तरुणाचा संशयास्पद मृत्यू:नातेवाईकांचा पोलिसांवर मारहाणीचा गंभीर आरोप; प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे




मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलिसांच्या कोठडीत 35 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. इमरान शेख असे या मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेशातील खंडवा येथील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात दोन दिवसांपूर्वीच तो मुंबईत आला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत याच्या चौकशीची जबाबदारी आता महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आली आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर रोजी सकाळी 10.18 वाजता इमरान सीएसएमटीच्या मुख्य आरपीएफ पोस्टवर खंडव्याला जाणाऱ्या गाड्यांची चौकशी करण्यासाठी आला होता. त्यावेळी तो अत्यंत अस्वस्थ होता आणि काही लोक आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा तो करत होता. काही वेळातच तो आक्रमक झाला आणि त्याने आरपीएफचे उपनिरीक्षक अनिकेत यांच्यावर हल्ला करत स्वतःलाही मारून घेण्याचा प्रयत्न केला. स्वतःला आणि इतरांना इजा पोहोचवू नये म्हणून पोलिसांनी त्याला बळाचा वापर करून आवरले. शौचालयात बेशुद्धावस्थेत आढळून आला दुपारी 12.30 च्या सुमारास इमरानला शौचालय वापरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, सात-आठ मिनिटे आतून कोणताही प्रतिसाद न आल्याने पोलिसांना दरवाजा उघडावा लागला, तेव्हा तो आत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु 12.54 वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी जीआरपीने अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असली तरी, पोलिसांच्या मारहाणीमुळेच इमरानचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. झडतीत दोन रेल्वेचे तिकिटे सापडली इमरानने आधी जीआरपी कर्मचाऱ्यांवरही हात उगारला होता, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. झडतीदरम्यान इमरानकडे कोणताही मोबाईल फोन किंवा ओळखपत्र सापडले नाही. मात्र, त्याच्याजवळ रेल्वेची दोन जनरल तिकिटे मिळाली आहेत. ज्यातील एक 18 सप्टेंबर 2026 चे खंडवा-भुसावळ आणि दुसरे 19 सप्टेंबर 2026 चे नाशिक-दादर प्रवासाचे आहे. त्याची ओळख आणि प्रवासाचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी त्याचा फोटो भुसावळ विभाग व स्थानिक पोलिसांकडे पाठवून त्याच्या हालचालींचा तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आरपीएफच्या कोठडीत मृत्यू झाल्याने या घटनेला वेगळे वळण लागले आहे. यामुळे महाराष्ट्र पोलिसांच्या सीआयडी विभागाने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, सीआयडी कोकण परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या नेतृत्वाखाली पुढील चौकशी सुरू आहे. इमरानच्या मृतदेहाचे जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. आता या शवविच्छेदनाचा अहवाल आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होऊ शकेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *