![]()
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार वितरण करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, संपादक आनंद हर्डीकर यांनी यावेळी सांगितले की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ हे पुस्तक आजच्या पिढीला सावरकरांचे विचार सोप्या भाषेत समजून घेण्यास मदत करेल. यामुळे युवा पिढीच्या अभ्यासाच्या वाटा खुल्या होतील. ललित लेखनासाठीचा निर्मला मोने स्मृती पुरस्कार अमृता खंडेराव यांच्या ‘कसं हुईन तं हू माय’ या पुस्तकाला मिळाला. उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठीचा पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या पुस्तकाला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सकाळ प्रकाशनासाठी अशुतोष रामगीर यांनी स्वीकारला. पुरस्कारांचे वितरण आनंद हर्डीकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक आणि कार्यवाह सुनेत्रा मंकणी मंचावर उपस्थित होत्या. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र आणि पाच हजार रुपये असे होते. हा कार्यक्रम परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. आनंद हर्डीकर यांनी पुढे सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांना समजून घेणाऱ्या युवा पिढीसाठी या ग्रंथांचे संपादन सोप्या भाषेत केले आहे. त्यामुळे सावरकरप्रेमी वाचकांना हे पुस्तक संग्राह्य वाटेल. ते म्हणाले, अमृता खंडेराव यांनी त्यांच्या कथांमधून बोलीभाषेचे सौंदर्य प्रभावीपणे दाखवले आहे. ग्रामीण भाषेतील अनोळखी शब्द आणि त्यातून निर्माण झालेले प्रसंग यामुळे निखळ विनोद तयार झाला आहे. हे लेखन वाचकांपर्यंत वेगळ्या पद्धतीने पोहोचेल. अध्यक्षीय भाषणात योगेश सोमण म्हणाले की, समाजमाध्यमांवरून प्रकाशित होणाऱ्या साहित्यापर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषदेने पोहोचणे ही काळाची गरज आहे. अमृता खंडेराव यांच्या लेखांचे रंगमंचीय सादरीकरण झाल्यास बोलीभाषेचे सौंदर्य रसिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल. ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार सर्व माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन’ या पुस्तक संचामुळे अभ्यासकांना संदर्भासाठी उपयुक्त माहिती मिळाली आहे.
Source link
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे पुरस्कार वितरण:'सावरकर विचार दर्शन' अन् 'कसं हुईन तं हू माय' ग्रंथांचा सन्मान