.


आझाद हिंद मंडळ, बुधवारा यांच्या ९९व्या वर्षानिमित्त आयोजित श्री श्याम कीर्तन कार्यक्रमात राजस्थानचे श्याम भजन गायक छोटू सिंह रावणा यांनी सादरीकरणाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. अमरावतीतील त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमाला श्याम भक्तांनी उपस्थिती लावत बुधवारा परिसर ‘जय श्री श्याम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्री खाटू श्याम यांचे विधिवत पूजन केले. मंडळाचे गणेशोत्सव उपाध्यक्ष ज्ञानेश्वर हिवसे व प्रा. अर्चना हिवसे यांच्या हस्ते श्याम बाबांची ज्योत प्रज्वलित केली. कार्याध्यक्ष विलास इंगोले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका मांडली. छोटू सिंह रावणा यांनी सादर केलेल्या श्याम भजनांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्या भजनांवर अनेक भाविकांनी ठेका धरत सहभाग नोंदवला. कार्यक्रमात विदर्भातील श्याम भजन गायक सुमित बावरा, मयंक छानगानी यांनीही भजने सादर केली. भजन, कीर्तन, जयघोष, आकर्षक प्रकाश व ध्वनी व्यवस्थेमुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.या वेळी छोटू सिंह रावणा यांनी आझाद हिंद मंडळाच्या ९९ वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रात मंडळाने केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगत शताब्दी महोत्सवाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, ॲड. यशोमती ठाकूर, ॲड. प्रशांत देशपांडे, बबलू शेखावत, अनिल अग्रवाल, माजी खा. अनंतराव गुढे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
मिक्स मास्टर इव्हेंटचे सचिन ठाकरे व त्यांच्या टीमने प्रकाश आणि ध्वनी व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. गणेशोत्सव अध्यक्ष सचिन वानखडे, उपाध्यक्ष विजय अग्रवाल, नितीन पांडे, विनोद वैद्य, कार्याध्यक्ष दीपक साहू सम्राट, स्वागताध्यक्ष प्रवीण मानेकर, सचिव रेवण सोमेश्वर पुसतकर, कोषाध्यक्ष मयूर जलतारे, सहसचिव अजय इंगोले यांच्यासह मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले. आझाद हिंद महिला मंडळाच्या सदस्यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलिस विभाग, प्रसारमाध्यमे आणि सहकार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचे मंडळातर्फे आभार मानण्यात आले. आझाद हिंद मंडळाच्या शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर आयोजित करण्यात आलेल्या या श्याम कीर्तनाने गणेशोत्सवातील धार्मिक उपक्रमांना विशेष रंगत आणली.
शहरात पहिलाच कार्यक्रम राजस्थानचे श्याम भजन गायक छोटू सिंह रावणा यांचा शहरातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याने भाविकांत उत्सुकता होती. कीर्तनादरम्यान त्यांनी मंडळाच्या ९९ वर्षांच्या वाटचालीचा उल्लेख करत सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले. शताब्दी महोत्सवाच्या दिशेने सुरू असलेल्या उपक्रमांच्या मालिकेत याचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रक्षेपणाने शहरा बाहेरील श्याम भक्तांनाही याचा अनुभव घेता आला. कार्यक्रमा साठी मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, आझाद हिंद महिला मंडळ सदस्यांनी योगदान दिले..