![]()
जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी साडेपाच लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र, मागील दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने ऐन वाढीच्या काळात पाणी न मिळाल्याने सर्वच पिके हातातून गेली आहेत. मात्र, मंगळवारी दुपारी १२ ते १२.३० या वेळेत पैठण शहरासह कातपूर, पिंपळवाडी आणि वैजापूर शहरासह म्हसकी शिवारात ३० मिनिटे जोरदार पाऊस झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद तालुक्यात पावसाचा खंड कायम असून मंगळवारी दिवसभर ऊन कायम असल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. जूनच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली नसल्याने खरिपाची पेरणी जुलैमध्ये उरकावी लागली. त्यात दोनच मोठे पाऊस झाल्याने पिके चांगली बहरली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकही पाऊस झालेला नसल्याने जिल्ह्यात ६ लाख ३६ हजार ९१५ हेक्टरवरील पिके कोमेजून गेली असल्याचे चित्र आहे. कन्नड, सिल्लोेड, गंगापूर, लासूर स्टेशन, बोरदहेगाव, सिल्लोड, फुलंब्री, करमाड परिसरात पावसाअभावी पिके माना टाकू लागली आहेत. या भागात पावसाची नितांत गरज आहे. मोठा पाऊसच नसल्याने नदी, नाले कोरडेठाक असून अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. जिल्ह्यात २७ सप्टेंबरनंतर पावसाचे पुनरागमन होण्याचा अंदाज आहे. २३ ते २६ सप्टेंबर पावसाची शक्यता नाही. २७ ते ३० सप्टेंबर कालावधीत बंगाल उपसागरातील हवामानाच्या बदलाने२७ सप्टेंबरपासून पावसाला अनुकूल वातावरण तयार होईल. ज्ञानेश्वर पायघन, सेवानिवृत्त कृषी अधिकारी ज्या शेतकऱ्यांचे सिंचनाची सोय आहे त्यांनी ठिंबकचा पर्याय स्विकारावा. तसेच ज्यांच्याकडे पाणी नाही त्यांनी पिकांमधील मशागतीची कामे करणे टाळावे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. मातीमधील ओल कमी होणार नाही, याकडे सर्वाधिक लक्ष देणे आवश्यक आहे. सप्टेंबरमध्येच सोयगाव तालुक्यात उन्हाळ्याची झळ जाणवू लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून कमाल तापमानात सातत्याने वाढ होत असून पारा तब्बल ३५ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचला आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.
Source link
पैठण, वैजापूर शहरामध्ये 42 दिवसांच्या खंडानंतर 30 मिनिटे बरसला वरुणराजा:गंगापूर, फुलंब्री, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, खुलताबादला दिवसभर ऊन