![]()
‘प्रामाणिकपणे कष्ट करा, तुमच्या दारात परमार्थ पाणी भरेल’ असा उपदेश १००८ महामंडलेश्वर त्रिवेंद्रानंद सरस्वती महाराज (गणेशानंद गड, पिंपळनेर) यांनी दिला आहे. कन्नड तालुक्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा देवपूळचा गणपती मंदिरात गेल्या सात दिवसांपासून गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित सप्ताहात महाराजांनी प्रतिपादन केले. या भव्य दिव्य उत्सव सोहळ्यात दररोज हजारो भाविक भक्त कीर्तन, भजन आणि महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. कीर्तनातून मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले, “आपण नित्यनियमाने हरिपाठ करतो, त्यातील पहिल्या ओळीत ‘हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा; पुण्याची गणना कोण करी”” असे म्हटले आहे. जो रोज ईश्वराचे स्मरण करतो, त्याच्या पुण्याची गणना कोणीही करू शकत नाही. देव लहान असो वा मोठा, तो देवच असतो; त्याला केवळ मनातील भाव महत्त्वाचा असतो. थोडी सत्ता किंवा संपत्ती आली म्हणून गर्वाने वागून चालत नाही. आत्मा आणि परमात्मा एकच आहेत. ज्याला कठीण साधना करता येत नाही, त्यांनी संसारात राहून देवाचे नामस्मरण करावे, हा अत्यंत सोपा उपाय आहे. “कीर्तन ही पाहण्याची नाही तर श्रवण करण्याची गोष्ट आहे. आपण आरतीत ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ म्हणतो. ईश्वर प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतो. जन्मदात्या आई-वडिलांच्या रूपातच परमात्मा तुमच्या घरी निवास करतो. ज्याला हे कळाले त्याला खरा धर्म कळाला,’ असे सांगत महाराजांनी प्रामाणिकपणाचा संदेश दिला. या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक, महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमवारी ताठे वाडा परिवाराच्या वतीने सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तिन्ही वेळेस महाप्रसाद सेवेचे विशेष आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी १००८ महामंडलेश्वर त्रिवेंद्रानंद सरस्वती महाराज (गणेशानंद गड, पिंपळनेर) यांची प्रबोधनात्मक कीर्तनसेवा पार पडली. यावेळी गावातील पंचक्रोशीतील हजारो भाविक महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंचदेव पूजा आणि नामस्मरणाचे महत्त्व “कीर्तनात महाराजांनी सांगितले की, शास्त्रात पंचदेव पूजा सांगितली असून दररोज पाच देवांचे नित्यनियमाने स्मरण करावे. ‘आ’ म्हणजे आत आणि ‘मा’ म्हणजे ज्ञान. जशी ग्रामीण बँक कर्ज पुरवठा करते, तसे सतत ‘हरि मुखे म्हणा’ असा जप केल्यास शरीराची सर्व यंत्रणा भगवंताच्या सेवेत तत्पर राहते. कष्ट प्रामाणिकपणे आणि इमानदारीने केले तर संत एकनाथ महाराजांच्या घरी जसे परमार्थाने पाणी भरले, तसेच तुमच्याही दारात समृद्धी आणि परमार्थ पाणी भरेल.
Source link
प्रामाणिकपणाने परिश्रम केल्यास तुमच्या दारात परमार्थ पाणी भरेल:1008 महामंडलेश्वर त्रिवेंद्रानंद सरस्वती महाराज यांचे प्रतिपादन