Headlines

अल्पवयीन मुलांना बोनेटवर बसवून धिंड:18 पोलिसांवर गुन्हा; सीआयडीच्या उपअधीक्षकांनी केली तक्रार, वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नाहीत




पुण्यात खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांना पोलिस वाहनाच्या बोनेटवर बसवून रस्त्यावरून नेल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह 18 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) पोलिस उपअधीक्षक संकेत सतीश गोसावी यांच्या तक्रारीवरून गुरुवारी पहाटे 4.25 वाजता आंबेगाव पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, 20 जुलै रोजी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर 21 जुलै रोजी काही मुलांना पोलिस वाहनाच्या बोनेटवर बसवून, दोरखंडाने बांधून सार्वजनिक रस्त्यावरून नेण्यात आले. यामुळे त्यांची ओळख उघड झाली. त्यांना जमावाकडून मारहाण झाल्याचाही आरोप तक्रारीत आहे. इतर मुलांना ताब्यात असताना मारहाण झाल्याचे, तसेच काहींना निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत ठेवल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेतली होती. आयोगाच्या तथ्यशोधन अहवालातील निरीक्षणे आणि पुढील आदेशांच्या आधारे सीआयडीमार्फत ही तक्रार देण्यात आली. भारतीय न्याय संहिता, बाल न्याय कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त आणि सहायक पोलिस आयुक्त यांची नावे या एफआयआरमधील आरोपींच्या यादीत नाहीत. या तिघांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळवल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, आदेशाची प्रत उपलब्ध नसल्याने स्थगिती नेमक्या कोणत्या कार्यवाहीला लागू आहे, हे स्पष्ट झालेले नाही. खुनाच्या मूळ गुन्ह्याचा तपास आणि त्यानंतर अल्पवयीन मुलांना पोलिसांनी दिलेल्या कथित वागणुकीवरील हा गुन्हा, ही दोन स्वतंत्र प्रकरणे आहेत. दाखल गुन्ह्यातील आरोपांची सत्यता तपासातून समोर येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *