Headlines

31 हजार कोटींच्या पॅकेजचे काय झाले?:खरीप गेला, आता किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवा; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल




राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती आणि सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या पाहणी दौऱ्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे नुकतेच झालेले बांधावरचे दौरे आणि आश्वासने केवळ कॅमेऱ्यापुरती मर्यादित असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच, गेल्या वर्षी अतिवृष्टीच्या वेळी सरकारने जाहीर केलेल्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचे नेमके काय झाले आणि त्यातील किती मदत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात पडली, याचा हिशोब देण्याची मागणी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. ३१ हजार कोटींचे पॅकेज गेले कुठे? राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सातत्याने नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. गेल्यावर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता, तेव्हा जमिनी खरडून गेल्या होत्या. “त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ३१ हजार कोटींचे आतापर्यंतचे सर्वात मोठे पॅकेज जाहीर केले होते. खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी साडेतीन लाख रुपये जाहीर केले होते. माझा सरकारला पहिला प्रश्न हाच आहे की, या ३१ हजार कोटींपैकी खरोखर किती मदत प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात पोहोचली आहे, याची माहिती महाराष्ट्राला मिळायला हवी,” असा थेट सवाल त्यांनी विचारला. पूर्वसूचना असूनही सरकार झोपेत होते का? यावर्षी मोसमाच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने आणि जागतिक संस्थांनी राज्यात दुष्काळ पडू शकतो, असा अंदाज वर्तवला होता. याकडे लक्ष वेधत ठाकरे यांनी सरकारच्या तयारीवर ताशेरे ओढले. “दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन सरकारने तेव्हापासून दुष्काळ निवारण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली? आज परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. आता जोरदार पाऊस जरी पडला तरी करपून गेलेल्या पिकांना कोंब फुटणार नाही. शेतकऱ्यांच्या हातातून खरीपाचा हंगाम पूर्णपणे गेला असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. निदान जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा आणि रब्बी हंगामाला पाणी मिळावे, यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो,” अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. ‘दौरे आणि आश्वासने केवळ कॅमेऱ्यापुरती’ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी दौऱ्यावर ठाकरे म्हणाले की, हे दौरे म्हणजे केवळ देखावा आहेत. “बांधावर जायचे, रडणाऱ्या शेतकऱ्याला जवळ घ्यायचे आणि ‘आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, तात्काळ मदत करू’ अशी आश्वासने द्यायची, यांचे नुसते फोटो आणि बातम्या येतात. पण प्रत्यक्षात शेतकरी पिण्याचे पाणी मागतोय, त्याच्या पोरांच्या लग्नाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि खायचे काय असा सवाल तो विचारतोय. या दाहक वास्तवाकडे सरकारचे लक्ष नाही. नुसते दौरे करून प्रश्न सुटणार नाहीत,” असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच, शिवसेनेच्या वतीने ‘तुमसे ना हो पायेगा’ या आंदोलनातून आम्ही केवळ आकांडतांडव न करता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य सूचना करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ही बातमी सातत्याने अपडेट होत आहे.. ही बातमी पण वाचा.. फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर:कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार अन् 2016-17 मधील वंचित शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणार- मुख्यमंत्र्यांची घोषणा राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पावसाच्या प्रदीर्घ खंडाने उभी पिके करपून गेल्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा थेट बांधावर उतरले आहेत. काल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर, मुख्यमंत्री आज विदर्भातील अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते प्रत्यक्ष बांधावर जाऊन पिकांची पाहणी करणार असून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *