![]()
ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्यमान उंचावण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून आरोग्य चळवळ अधिक गतिमान करावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले. जिल्हा परिषदेच्या सभागृहात गुरुवारी (ता. 24) मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 563 ग्रामपंचायतींमध्ये अभियान यावेळी बोलताना विवेक गायकवाड यांनी हिंगोली जिल्ह्यातील सर्व 563 ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान व्यापक लोकचळवळीच्या स्वरूपात राबविण्याचे आवाहन केले. गावातील नागरिक, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास अभियानाला अपेक्षित यश मिळेल, असे त्यांनी सांगितले. सामूहिक प्रयत्नातून हिंगोली जिल्ह्यातील किमान एक गाव राज्यस्तरावरील पुरस्कारासाठी पात्र ठरले पाहिजे, असा संकल्पही यावेळी करण्यात आला. ‘गाव निरोगी झाले तर जिल्हा निरोगी होईल आणि जिल्हा निरोगी झाला तर राज्य निरोगी होईल,’ असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 31 मार्चपर्यंत पूर्वतयारी पूर्ण करण्याचे निर्देश ग्रामीण भागातील शेवटच्या घटकातील नागरिकाला त्याच्या घरापासून जवळ, सर्वसमावेशक, मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी अभियानाशी संबंधित सर्व पूर्वतयारी आणि नियोजित कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड यांनी दिले. अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचा दर्जा सुधारण्यासोबतच नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायतींचे गुणांकन, निकषांची माहिती प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी ग्रामपंचायतींचे गुणांकन करण्याची पद्धत, मूल्यमापनाचे निकष आणि विजेत्या ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या पारितोषिकांची माहिती कार्यशाळेत दिली. त्यामुळे ग्रामपंचायतींनी अभियानाच्या विविध घटकांवर नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची सविस्तर रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली. अभियानाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची पद्धत आणि विविध विभागांची भूमिका याबाबत त्यांनी माहिती दिली. सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे आणि समन्वयाने काम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे सांगितले. यावेळी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानासोबतच ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीनेही आवश्यक सूचना देण्यात आल्या. कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, उपशिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार या कार्यशाळेत करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात 563 ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अभियानातून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. हेही वाचा… रोहित पवारांचा MPSC अध्यक्षांवर पुन्हा हल्लाबोल:‘4 हजार स्क्वेअर फुटांचं ऑफिस, महिन्याला 10 लाख भाडं’, थेट राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. आयोगाचे बेलापूर येथे कार्यालय असताना अध्यक्षांसाठी मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये स्वतंत्र आणि महागडे कार्यालय घेतल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. सविस्तर वाचा…
Source link
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’:अभियानातून हिंगोलीत आरोग्य चळवळीला गती, 563 ग्रामपंचायतींमध्ये राबवणार अभियान