![]()
गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना दिल्या जाणाऱ्या प्रसादासह विविध खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) विशेष लक्ष केंद्रित केले आहे. पुणे शहरात एफडीएकडून तब्बल 20 पथके तैनात करण्यात आली असून मिठाई, मावा, खवा तसेच इतर खाद्यपदार्थांची दुकाने आणि उत्पादन केंद्रांची तपासणी सुरू आहे. खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जात असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. सार्वजनिक मंडळे, गणेशभक्त आणि विविध संस्था यांच्याकडून भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाते. या पार्श्वभूमीवर प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता महत्त्वाची ठरते. त्यामुळे विसर्जनाच्या काळात प्रसादाच्या माध्यमातून भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी एफडीएने तपासणीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. शहरात 20 पथकांकडून तपासणी पुणे विभागातील अन्न व औषध प्रशासनाने शहरातील विविध भागांसाठी 20 पथके कार्यरत केली आहेत. सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही पथके काम करत असून प्रत्येक क्षेत्रात 2 ते 3 अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारपासून तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली असून रात्रीही विविध ठिकाणी कारवाई सुरू होती. शहरातील मिठाईची दुकाने, मिठाई तयार करणारे कारखाने, मावा-खवा विक्रीची ठिकाणे तसेच इतर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी केली जात आहे. संशयास्पद किंवा गुणवत्तेबाबत शंका असलेल्या खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवले जात आहेत. मावा, खवा आणि मिठाईवर विशेष लक्ष गणेशोत्सवाच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. मावा, खवा, दूध आणि त्यापासून तयार होणाऱ्या मिठाईचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे या पदार्थांमध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे घटक वापरले जात नाहीत ना, याची तपासणी एफडीएकडून केली जात आहे. मिठाई तयार करण्याच्या ठिकाणी स्वच्छता, खाद्यपदार्थांची साठवणूक, उत्पादनासाठी वापरले जाणारे घटक आणि विक्रीसाठी ठेवलेल्या पदार्थांची गुणवत्ता याचीही पाहणी केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. प्रसाद वाटपाच्या ठिकाणीही नजर विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेक ठिकाणी गणेशभक्तांना प्रसादाचे वाटप केले जाते. त्यामुळे केवळ मिठाईच्या दुकानांपुरतीच एफडीएची कारवाई मर्यादित नसून प्रसादाच्या दर्जावरही लक्ष ठेवले जात आहे. प्रसादासाठी वापरले जाणारे खाद्यपदार्थ सुरक्षित आहेत का, त्यांची साठवणूक योग्य पद्धतीने केली आहे का, याचीही पाहणी केली जाणार आहे. मिरवणुकीच्या ठिकाणी प्रसादाबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित ठिकाणी तातडीने पथक पाठवून तपासणी आणि आवश्यक कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे. मिरवणुकीच्या बंदोबस्ताचा भाग नाही दरम्यान, एफडीएची ही पथके गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पोलिस बंदोबस्ताचा किंवा इतर व्यवस्थेचा भाग नसतील. त्यांचे मुख्य काम खाद्यपदार्थांची विक्री, वितरण आणि प्रसादाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणे हे आहे. खाद्यपदार्थांशी संबंधित तक्रारी मिळाल्यास त्यावर तत्काळ कार्यवाही करण्यासाठी पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. आज आणि उद्याही तपासणी सुरू राहणार गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही तपासणी मोहीम आज दिवसभर सुरू राहणार असून उद्याही विविध भागांत तपासणी करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून नमुने घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात खाद्यपदार्थांच्या विक्रीत नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने एफडीएकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दि. वा. भोगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा पुणे शहरात प्रथमच मोठ्या प्रमाणावर 20 पथके तैनात करून तपासणी मोहीम राबवली जात आहे. गणेश विसर्जनाच्या काळात भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, तसेच प्रसादाच्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. हेही वाचा…. अवघ्या महिन्याच्या बाळाची 1 लाख 20 हजारांना विक्री:जन्मदात्या आई-वडिलांकडूनच चिमुरड्याचा सौदा आईच्या कुशीत विसावण्याचे आणि आईचे दूध पिण्याचे वय असलेल्या अवघ्या महिनाभराच्या बाळाची तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरातील मुकुंदवाडी परिसरात समोर आला आहे. विशेष म्हणजे, या बाळाचा जन्मदात्या आई-वडिलांनीच पैशांच्या मोबदल्यात त्याचा व्यवहार केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बाळाची बेकायदेशीर खरेदी करणाऱ्या मायलेकींसह जन्मदात्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
Source link
पुण्यात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर FDAची धडक मोहीम:मिठाई, मावा, खवा आणि प्रसादाची तपासणी, 20 पथके मैदानात