Headlines

विमानतळाच्या फनल झोनमध्ये अनधिकृत बांधकाम:शिवसेनेच्या नगरसेविकेला महापालिकेची नोटीस




नांदेड विमानतळाच्या रनवे लगतच्या फनल झोनमध्ये मंजूर नकाशाला हरताळ फासून बांधकाम केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल गजानन पाटील आणि गजानन तुकाराम पाटील यांना महापालिकेने नोटीस बजावली असून, २८ सप्टेंबर रोजी तरोडा-सांगवी क्षेत्रीय कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या ना हरकत प्रमाणपत्रातील मर्यादेपेक्षा अधिक बांधकाम झाल्याचेही विमानतळ प्रशासनाने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळाच्या फनल झोनमध्ये संरक्षण भिंतीलगत असलेल्या भूखंडावर गजानन पाटील आणि मीनल पाटील यांच्या मालकीच्या जागेवर आरसीसी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे हे बांधकाम नसल्याचे पाहणीत आढळून आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. अनधिकृत बांधकाम पाडावे यापूर्वीच महापालिकेने १ जून २०२६ रोजी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील कलम ५३(१) अन्वये नोटीस बजावली होती. मंजूर परवानगीपेक्षा वेगळे बांधकाम केल्याचे तसेच काही बांधकामासाठी परवानगी नाकारलेली असतानाही बांधकाम सुरू ठेवल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले होते. अनधिकृत बांधकाम पाडावे, अनधिकृत वापर बंद करावा आणि बांधकाम थांबवावे, असे निर्देशही देण्यात आले होते. तीन मजल्यांवर शेकडो चौरस मीटर बांधकाम महापालिकेच्या पाहणीत ग्राउंड फ्लोअरवर २४६.०४९ चौ.मी., फर्स्ट फ्लोअरवर २३९.५११ चौ.मी. आणि सेकंड फ्लोअरवर २५६.२११ चौ.मी. अनधिकृत बांधकाम असल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणजेच तीनही स्तरांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम झाल्याचा महापालिकेचा दावा आहे. मात्र, यापूर्वीच्या नोटिशीनंतरही अपेक्षित कार्यवाही न झाल्याने महापालिकेने २१ सप्टेंबर रोजी पुन्हा नोटीस बजावली. संबंधितांनी मालकी हक्काची कागदपत्रे घेऊन २८ सप्टेंबर रोजी सुनावणीस उपस्थित राहून आपली बाजू मांडावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सुनावणीस गैरहजर राहिल्यास संबंधितांना काही म्हणणे नाही, असे गृहीत धरून नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे. विमानतळ संचालकांचे आयुक्तांना पत्र या बांधकामामुळे केवळ महापालिकेच्या बांधकाम नियमांचाच प्रश्न निर्माण झाला नसून विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड विमानतळ संचालकांनी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रात निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा संबंधित बांधकाम अधिक असल्याचे दिसून येत असल्याचे विमानतळ संचालकांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित ठिकाणी पुन्हा तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *