![]()
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यभरात रान उठवणारे मनोज जरांगे पाटील आता अधिक आक्रमक झाले आहेत. आरक्षणाची लढाई सुरू असतानाच, मागील तीन वर्षांत ज्यांनी या आंदोलनाला ‘डॅमेज’ करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याविरोधात आता जरांगे यांनी उघड भूमिका घेतली आहे. “आम्ही सध्या शांत आहोत, कारण ही वादळापूर्वीची शांतता आहे. तीन वर्षांत खूप घाण कचरा जमा झालाय, मस्तवाल झालेल्यांची ही घाण आता साफ करावीच लागेल,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. ‘ही वादळापूर्वीची शांतता’ जरांगे पाटील यांनी आपल्या शांततेचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले, “आम्ही प्रमाणपत्र रद्द झाल्यावरही थोडं शांत राहिलो. म्हणजे याचा अर्थ आम्ही पण काही गोष्टी शिकलो आहोत. ही वादळापूर्वीची शांतता आहे. छत्रपती शिवरायांकडे जेव्हा लढण्यासाठी मोठ्या फौजा यायच्या, तेव्हा तिथे सन्नाटा का असायचा? तेच आम्हालाही बघू द्या. आता आम्हाला रस्त्यावरची लढाई पण लढायची आहे.” ‘घाण कचरा काढावाच लागेल’ आरक्षणाच्या लढ्यात काही लोकांनी केलेल्या अडथळ्यांवर आणि बदनामीवर जरांगे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “तीन वर्ष झालं खूप घाण कचरा झाला होता, तो पण थोडा आता काढावा लागेल. समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी काम करतोय म्हणून तुम्ही आम्हाला इतका त्रास देणार का? आम्ही तीन वर्षे सहन केलं हो. आता हा घाण कचरा काढू द्या. खूप मस्तवालून गेलेत हे लोक. आमच्यावर आंदोलनाची जबाबदारी असल्यामुळे आम्ही संयम बाळगला. पण आता आरक्षण कुठेच जात नाही आणि जाऊन पण देत नाही. मात्र ही तीन वर्षांची बुळबुळ आणि घाण काढावीच लागेल,” असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. ‘कोण काय बोलतंय यावर आमचे लक्ष’ आगामी काळातील रणनीतीबाबत सूचक वक्तव्य करताना जरांगे म्हणाले, “आता पुढील तीन महिने आम्ही फक्त समाजाच्या विरोधात कोण बोलतंय आणि सरकार, पक्ष किंवा नेत्याकडून कोण काय बोलतंय, हे बघायचं ठरवलं आहे. त्यानंतर तुम्हाला पुढचे ऐकायला मिळेल.” मित्रांबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, “आपल्याला आधी माहीत नसतं की कुणाचा स्वभाव कसा आहे. पण आता समाजाला आणि लोकांना त्यांचा स्वभाव माहीत झाला आहे. भाजपमधलेही बोलले, हेही बोलतायत. त्यांना बोलू द्या, ते पुढे आम्हाला कामाला येतील.” ————- ही बातमी पण वाचा.. महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर!:राज्याच्या 75 टक्के भागाला तातडीने दिलासा; कर्जवसुलीस स्थगिती, परीक्षा फी माफीसह मुख्यमंत्र्यांचे 12 मोठे निर्णय पावसाच्या मोठ्या खंडाने आणि अल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा व दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये अधिकृतरीत्या कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. कृषी आयुक्तांच्या अहवालानुसार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची पहिली कळ (Trigger-1) लागू झाली असून, महसूल व मदत-पुनर्वसन विभागाने याबाबतचा अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. राज्यातील सुमारे ७५ टक्के भूभाग आता दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला असून, शेतकऱ्यांसाठी सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. सविस्तर वाचा
Source link
ही तर वादळापूर्वीची शांतता!:समाजाशी बेईमानी करणाऱ्या मस्तवाल नेत्यांची 'घाण' आता काढणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा