![]()
मकरमतपूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गणिताचा प्रश्न सोडवता न आल्याने चौथीतील विद्यार्थ्याला शिक्षकाने दांड्याने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याच्या पायावर व शरीरावर दांड्याने मारहाण करण्यासह चेहऱ्यावर थप्पड मारल्याचा आरोप आहे. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या ओठातून रक्त आले. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात शिक्षक राजू डुकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी २४ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी शाळेत गेला होता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास गणिताचा तास सुरू असताना त्याला प्रश्न सोडवता आला नाही. या वेळी शिक्षक राजू डुकरे यांनी त्याला दांड्याने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. पाय व शरीरावर मारण्यासह चेहऱ्यावर थप्पड मारल्याने विद्यार्थ्याच्या ओठातून रक्त आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळा सुटल्यानंतर घरी परतलेला श्रेयस एकटाच रडत बसला होता. विद्यार्थ्याच्या विचारणा केल्यानंतर त्याने शिक्षकाने मारहाण केल्याचे सांगितले. वडिलांनी शिक्षकाला दूरध्वनीवरून जाब विचारला असता, ‘फक्त एकदाच मारले,’ असे सांगून त्यांनी फोन बंद केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात नेऊन उपचार केले. पुढे पोलिसांत तक्रार दिल्यानंतर शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
Source link
गणित चुकल्याने चौथीतील विद्यार्थ्यास शिक्षकाने मारले:मकरमतपूरवाडी जि. प. शाळेतील शिक्षकावर गुन्हा