Headlines

'माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानात उत्कृष्ट कामगिरी करा:CEO विवेक गायकवाड यांचे आवाहन, ब्रह्मपुरी ग्रामस्थांचा प्लास्टिक मुक्तीचा निर्धार




मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि स्मार्ट ग्राम म्हणून ओळख निर्माण केलेल्या ब्रह्मपुरी गावाने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानातही उत्कृष्ट कामगिरी करावी. राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्यासाठी आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आणि विशेष प्लास्टिकमुक्त गाव मोहिमेच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शनिवारी ता २६ हिंगोली तालुक्यातील ब्रह्मपुरी ग्रामपंचायतीला भेट देऊन विविध विकासकामांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ ग्रामस्थांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती देण्यात आली. तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून प्लास्टिक कचरा संकलन मोहीम राबवून गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्धार करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या आढाव्यानंतर गायकवाड यांनी अंगणवाडीला भेट देऊन बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेची पाहणी केली. लहान वयातच मुलांना अक्षरांची प्राथमिक ओळख होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन त्यांनी सुमारे एक तास विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षकाची भूमिका घेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना मराठी वर्णाक्षरांचे इंग्रजीतील रूपांतर करून बाराखडी सोप्या व रंजक पद्धतीने शिकविली. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया पहिल्या वर्गापासून मजबूत झाला, तर गावातील एकूण शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. केंद्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना बाराखडी उत्तम प्रकारे अवगत झाली पाहिजे, यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केंद्रप्रमुखांना दिल्या. यावेळी सरपंच शीतल घनगाव, उपसरपंच शिवकन्या तावरे, विस्तार अधिकारी विष्णू भोंजे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग भुरके, ग्रामपंचायत अधिकारी गजानन राऊत, आरोग्य कर्मचारी विजय वाकडे, आरोग्य सेविका रीना ठाकूर, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *