![]()
गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. वाडीवऱ्हे रस्त्यालगत असलेल्या पाण्याच्या डोहात बुडणाऱ्या आपल्या 14 वर्षीय मुलाला वाचवताना वडिलांचा आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बचाव पथकाने अथक प्रयत्नांनंतर या बापलेकाचे मृतदेह पाण्याबाहेर काढले असून, या घटनेमुळे संपूर्ण सिडको परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. संजय धोंडू सोनवणे (वय 48, रा. सावतानगर, अक्षय चौक, सिडको) आणि त्यांचा 14 वर्षांचा मुलगा श्री सोनवणे अशी या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. संजय सोनवणे हे रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत होते. गुरुवारी गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला ते आपला मुलगा श्री आणि व्यवसायातील काही सहकाऱ्यांसोबत ‘पहिले बारी ते वाडीवऱ्हे’ रस्त्यालगत फिरण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर ते एका पाण्याच्या डोहाजवळ थांबले होते. संजय सोनवणे यांना पोहता येत असल्याने ते डोहातील पाण्यात उतरून पोहत होते, तर त्यांचे सहकारी बाहेरच उभे होते. आपल्या वडिलांना पोहताना पाहून 14 वर्षांच्या श्रीलाही मोह आवरला नाही आणि तोही पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळातच तो खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. मुलाला वाचवण्याचा वडिलांचा अखेरचा प्रयत्न आपला मुलगा पाण्यात बुडत असल्याचे लांबूनच संजय यांच्या लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने धाव घेतली. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात संजय सोनवणे हे स्वतःही त्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आणि दोघांचाही पाण्यात बुडून अंत झाला. पोलिस व बचाव पथकाची शोधमोहीम या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ पाण्यात शोधमोहीम सुरू केली. बचाव पथकाने काही काळाच्या अथक प्रयत्नांनंतर संजय सोनवणे आणि त्यांचा मुलगा श्री या दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर संजय सोनवणे हे रिअल इस्टेट व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ऐन गणेशोत्सवाच्या काळात कुटुंबातील कर्ता पुरुष आणि तरुण मुलगा एकाच वेळी गमावल्यामुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने वाडीवऱ्हे तसेच संपूर्ण सिडको परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
Source link
हृदयद्रावक! बुडणाऱ्या लेकाला वाचवण्यासाठी बापाने मारली उडी:दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू, नाशिकमधील थरकाप उडवणारी घटना