Headlines

चंद्रकांत पाटलांचे मोठे वक्तव्य:पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार दोन दिवसांत ठरणार




महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महायुतीतील उमेदवारीवरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही जागांवर महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जागावाटपाचा निर्णय महायुतीच्या घटक पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. भाजपकडून या दोन्ही जागांसाठी उमेदवारांची नावे येत्या दोन दिवसांत निश्चित केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा भाजपच्या पारंपरिक मतदारसंघातील असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, अंतिम निर्णय हा महायुतीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतला जाणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होईल. नेतृत्वाकडून जो निर्णय घेतला जाईल, तो मान्य असेल, असे पाटील यांनी सांगितले. महायुतीत दोन्ही जागांसाठी रस्सीखेच पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. विद्यमान आमदार अरुण लाड यांचा कार्यकाळ संपत असल्याने या जागेसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीची घोषणा होताच महायुतीतील घटक पक्षांनी या जागेवर दावा करण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून शरद लाड यांच्या नावाची चर्चा सुरू असून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रताप ऊर्फ भैय्या माने यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला मिळणार, याकडे महायुतीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिक्षक मतदारसंघातही अनेक इच्छुक पुणे शिक्षक मतदारसंघासाठीही महायुतीतील घटक पक्षांकडून तयारी सुरू आहे. शिवसेनेकडून मंगेश चिवटे आणि प्रा. डॉ. सचिन सानप यांच्या नावांची चर्चा आहे. भाजपकडून कौस्तुभ गावडे यांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाची उमेदवारीही महायुतीमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. भाजपकडून दोन्ही जागांवर दावा केला जात असला, तरी महायुती म्हणून निवडणूक लढविण्याची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जागावाटप करताना घटक पक्षांमध्ये कोणता फॉर्म्युला ठरतो, यावर पुढील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. 26 सप्टेंबरला मतदार नोंदणीची अंतिम मुदत पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीची प्रक्रिया यापूर्वीच सुरू करण्यात आली होती. विभागीय प्रशासनाने अंतिम मतदार याद्याही प्रसिद्ध केल्या आहेत. पुणे विभागात पदवीधर मतदारसंघासाठी सुमारे 3 लाख 11 हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी सुमारे 52 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. दरम्यान, 2026च्या विधान परिषद निवडणूक कार्यक्रमानुसार पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 23 ऑक्टोबरला मतदान होणार असून 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 6 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडेही लक्ष महायुतीमध्ये उमेदवारीवरून चर्चा सुरू असतानाच महाविकास आघाडी कोणाला मैदानात उतरवणार, याचीही उत्सुकता आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारांची नावे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपच्या उमेदवारांची नावे दोन दिवसांत जाहीर होतात का, तसेच महायुतीतील जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला काय ठरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेगाव संस्थानचा पुढाकार:मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी 11 लाखांचा निधी सुपूर्द यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात पावसाने मोठी ओढ दिली असून, त्यामुळे संपूर्ण राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान या न्यासाने मदतीचा हात पुढे केला आहे. संस्थानच्या वतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ 1 कोटी 11 लाख रुपयांचा सहयोग निधी देण्यात आला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *