![]()
राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांच्या यादीत नांदेड जिल्ह्यातील मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यांचा समावेश न झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरण देत, दोन्ही तालुके ‘ट्रिगर-1’च्या निकषात बसले नसले तरी ‘ट्रिगर-2’च्या प्रक्रियेत त्यांचा निश्चितपणे विचार केला जाईल, असा दावा केला आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेत ‘ट्रिगर-1’मध्ये पावसाचे प्रमाण, पावसातील खंड यांसारख्या निकषांचा विचार केला जातो. या निकषांमध्ये मुदखेड आणि मुखेड हे 2 तालुके बसले नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. मात्र, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ‘ट्रिगर-2’च्या प्रक्रियेत जमिनीतील ओलावा, पिकांची परिस्थिती आणि इतर निकषांचा विचार केला जाणार असून, त्यावेळी या दोन्ही तालुक्यांचा समावेश होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “कुठलाही तालुका हेतुपुरस्सर वगळण्याचे कारण काय? आम्ही तसे का करू?” असा सवालही अशोक चव्हाण यांनी केला. मराठवाड्यातील कोणत्याही तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्द त्यांनी दिला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या आढाव्यात मराठवाड्यातील 76 पैकी 74 तालुक्यांचा ‘ट्रिगर-1’मध्ये समावेश झाला असून, मुदखेड आणि मुखेड हे 2 तालुके वगळले गेले आहेत. ‘पीक हिरवे दिसत असले तरी उत्पन्न मिळेलच असे नाही’ दुष्काळी परिस्थितीचे केवळ बाह्य स्वरूप पाहून निर्णय घेता येणार नाही, असेही चव्हाण यांनी सांगितले. अनेक ठिकाणी पिके हिरवीगार दिसत असली तरी पावसात 20 ते 25 दिवसांचे खंड पडल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळालेले नाही. त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याचे सांगत, “दिसताना हिरवे दिसत असले तरी त्यातून उत्पन्न काय निघणार आहे, हे महत्त्वाचे आहे,” असे चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांना खासगी कर्जाबाबत मदत मिळावी तसेच शासनाची मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. पीक पाहणीसोबतच स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्ष मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर निर्णय शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, या प्रश्नावर अशोक चव्हाण यांनी ही प्रक्रिया मूल्यांकनावर आधारित असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल घेतल्यानंतर मंत्रिमंडळ उपसमिती त्याचा सविस्तर आढावा घेईल. त्यानंतर उपलब्ध निधी आणि नुकसानीचा आवाका लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ‘ट्रिगर-1’नंतर पुढील टप्प्यात जमिनीतील ओलावा, उपग्रह निर्देशांक, भूजल पातळी आणि पीक परिस्थिती यांसारख्या घटकांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे ‘ट्रिगर-2’ची प्रक्रिया मुदखेड आणि मुखेडसाठी महत्त्वाची ठरणार आहे. ‘मुख्यमंत्र्यांशी माझे बोलणे झाले’ मुदखेड आणि मुखेडच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपले बोलणे झाले असल्याचेही अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच संबंधित लोकप्रतिनिधींचाही सरकारशी संपर्क असल्याचे त्यांनी नमूद केले. दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी विरोधकांवरही टीका केली. दुष्काळ हा पक्ष पाहून ठरवला जात नाही. मुदखेड असो किंवा मुखेड, दोन्ही तालुक्यांतील परिस्थितीचा निकषांनुसार विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, या 2 तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश न झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, त्यांचा पुढील टप्प्यात समावेश करण्याची मागणी होत आहे. हेही वाचा…. ‘जातीच्या नावावर तिकीट घेणारा नेता समाजाचा विकास करत नाही’:केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा राजकीय रणनीतीवर हल्लाबोल भारतातील निवडणुकांमध्ये उमेदवारी देताना बहुतांश राजकीय पक्ष ज्या मतदारसंघात ज्या जातीचे मतदार जास्त आहेत, त्याच समाजाच्या नेत्याला तिकीट देण्याची रणनीती वर्षानुवर्षे अवलंबत आले आहेत. मात्र, जातीपातीच्या या राजकीय गणितावर आणि तिकीट वाटपाच्या प्रथेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जोरदार टीका केली आहे. जातीच्या नावावर तिकीट मिळवणारा नेता संबंधित समाजाचा कधीही विकास करत नाही, अशा स्पष्ट शब्दांत गडकरी यांनी या प्रवृत्तीवर कडाडून हल्लाबोल केला आहे. सविस्तर वाचा….
Source link
मुदखेड-मुखेडचा दुष्काळी यादीत समावेश होणार? अशोक चव्हाण म्हणाले,:‘ट्रिगर-2’मध्ये दोन्ही तालुके निश्चित घेतले जातील; ‘मराठवाड्यातील कोणत्याही तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही’