Headlines

"तू माझ्यासाठी खूप केलं, आता सहन होईना..":पत्नीला शेवटचा भावनिक मेसेज; कर्ज फेडूनही सावकारी जाचाला कंटाळून पतीने उचलले टोकाचे पाऊल




कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनगे येथे एका धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. खासगी सावकाराकडून घेतलेल्या 9 लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल 26 लाख रुपये परत करूनही, आणखी 25 लाखांच्या मागणीसाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून 48 वर्षीय श्रीधर दत्तात्रय डावरे (रा. सोनगे, ता. कागल) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निवास आप्पासो पाटील (रा. बामणे, ता. कागल) हा खासगी सावकारी करतो. श्रीधर डावरे यांनी त्याच्याकडून 9 लाख रुपये व्याजाने घेतले होते. या रकमेच्या परताव्यापोटी डावरे यांनी आतापर्यंत त्याला 26 लाख रुपये दिले होते. असे असतानाही, आरोपी पाटील त्यांच्याकडे आणखी 25 लाख रुपयांची मागणी करत होता आणि त्यासाठी त्यांना सतत मारहाण करून धमकावत होता. पत्नीला पाठवला भावनिक मेसेज सावकाराच्या या सततच्या त्रासाला आणि मानसिक तणावाला कंटाळून श्रीधर डावरे यांनी 23 सप्टेंबर रोजी पत्नी सविता यांना एक अत्यंत भावनिक मेसेज पाठवला. त्यात त्यांनी लिहिले, “सविता तू माझ्यासाठी भरपूर केलंस, पण मी काही करू शकलो नाही, मला माफ कर. मी माझ्या समू जवळ जातो, तू शंभोला फुलासारखं सांभाळ.” या मेसेजमध्ये “माझ्या खिशात चिठ्ठी ठेवली आहे, मला आता सहन होईना झालंय.” असा उल्लेखही त्यांनी केला होता. तणनाशक प्राशन करून जीवन संपवले पत्नीला हा मेसेज आणि खिशात ठेवलेल्या चिठ्ठीचे दोन फोटो पाठवून श्रीधर डावरे यांनी विषारी तणनाशक प्राशन केले. त्यांना तातडीने निपाणी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती खालावल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर (CPR) रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने 26 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आरोपी सावकारावर गुन्हा दाखल या प्रकरणी श्रीधर डावरे यांच्या पत्नी सविता डावरे यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून, आरोपी निवास पाटील याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *