Headlines

थोरातांच्या गेस्ट हाऊसमध्ये राजकीय विरोधक एकत्र:जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी बैठक, सुजय विखे थेट थोरातांच्या पाया पडले




अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आगामी निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आणणारी घटना समोर आली आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत राजकीयदृष्ट्या परस्परांचे विरोधक मानले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील एकाच व्यासपीठावर आले. त्यानंतर बैठकीच्या समारोपावेळी सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना वाकून नमस्कार करत त्यांच्या पाया पडल्याचे दृश्य समोर आले. थोरात यांनीही विखे यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना प्रतिसाद दिला. या प्रसंगाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेते, लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. बाळासाहेब थोरात यांच्या संस्थेच्या गेस्ट हाऊसमध्ये ही बैठक झाल्याची माहिती आहे. बैठकीबाबत सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात गोपनीयता ठेवण्यात आली होती. जिल्ह्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची लढाई न बनवता ती बिनविरोध करण्यासाठी सर्व पक्षांनी प्रयत्न करावेत, या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली. दुष्काळामुळे शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने असताना निवडणुकीचा अतिरिक्त खर्च आणि राजकीय संघर्ष टाळून सहकार क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका मांडण्यात आली. विखे-थोरात एकाच ठिकाणी अहिल्यानगरच्या राजकारणात बाळासाहेब थोरात आणि विखे कुटुंबातील राजकीय संघर्षाची चर्चा सातत्याने होत आली आहे. त्यामुळे या बैठकीत सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांची झालेली उपस्थिती विशेष ठरली. बैठकीला माजी मंत्री शंकरराव गडाख, भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार विवेक कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते, आमदार हेमंत ओगले, काँग्रेसचे करण ससाणे यांच्यासह विविध पक्षांतील नेते उपस्थित होते. आमदार मोनिका राजळे आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीत सहभाग नोंदवत बिनविरोध निवडणुकीच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याची माहिती आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन यापूर्वीही करण्यात आले होते. शेतकरी, सहकारी संस्था आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी थेट जोडलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर खर्च होऊ नये, तसेच सध्याच्या परिस्थितीत राजकीय शक्ती आणि वेळ निवडणुकीऐवजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वळवता यावा, अशी भूमिका मांडण्यात आली होती. बैठकीतही याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय सहमती निर्माण करण्यावर भर देण्यात आला. बँकेचे कामकाज अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार क्षेत्राच्या हितासाठी एकत्र येण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. बैठकीनंतरचा तो प्रसंग चर्चेत बैठक संपल्यानंतर उपस्थित नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. याच वेळी सुजय विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधले. सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना वाकून नमस्कार करत त्यांच्या पाया पडले. त्यानंतर थोरात यांनी विखे यांच्या पाठीवर थाप मारली. दोन्ही नेत्यांमधील हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर राजकीय चर्चेला आणखी उधाण आले. एकीकडे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय विचारांचे नेते एकत्र येत असताना दुसरीकडे विखे आणि थोरात यांच्यासारखे राजकीय विरोधक एकाच बैठकीत दिसल्याने या घडामोडीकडे राजकीयदृष्ट्याही लक्ष वेधले गेले आहे. बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना कितपत यश? बैठकीत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर एकमत झाले असले तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पुढे जात असताना अंतिम राजकीय समीकरण काय राहणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विविध पक्षांतील इच्छुक, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि संचालकपदासाठीची स्पर्धा यामुळे पुढील काळात चर्चा आणि बैठका सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या घडीला जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या निमित्ताने अहिल्यानगरच्या राजकारणातील अनेक विरोधी गट एका टेबलावर आल्याचे चित्र आहे. त्यातच सुजय विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना केलेला नमस्कार आणि त्यानंतर थोरातांनी दिलेला प्रतिसाद हा या बैठकीतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. हेही वाचा… दुष्काळी परिस्थितीवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा:शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख देण्याचीही केली मागणी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी प्रमुख मागणीही त्यांनी केली आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *