Headlines

‘निवडणुका जिंकण्यासाठी कोणाला मदत करत होते?’:ज्ञानेश कुमारांना हटवण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी




मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अधिकाराचा उघड गैरवापर झाला आहे. ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते? असा सवाल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. हा विषय अत्यंत गंभीर असून निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काही अर्थच उरणार नाही. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच आयोगाच्या वतीने निर्णय घेत होते, ही बाब जगजाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘एक्स’ पोस्टाद्वारे केली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोग ही संविधानाच्या कलम ३२४ अन्वये स्थापन झालेली घटनात्मक संस्था असून १९९५ मधील ‘टी.एन. शेषन विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये निवडणूक आयुक्तांचे अधिकार आणि भूमिका स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारवर झालेला हा सर्वात गंभीर आरोप आहे. ‘आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले’, हा खुलासा टिकत नसल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर दोन सदस्यांपैकी कोणी तरी सत्य सांगत नाहीये. मतभेद असू शकतात; मात्र कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी काँग्रेस पक्षाने ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सुमोटो दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करावी. मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाने महाभियोगाचा प्रस्ताव मांडावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *