![]()
गणेश विसर्जन मिरवणूक मशिदीजवळ पोहोचताच अजान व नमाजाची वेळ झाल्याचे लक्षात येताच आझाद व नवयुग गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने मिरवणूक थांबवली. हलगीसह सर्व वाद्यांचा आवाज बंद करून जवळपास अर्धा तास शांतता राखण्यात आली. मुस्लिम बांधवांची अजान व नमाज पूर्ण झाल्यानंतर पुन्हा वाद्यांचा नाद सुरू झाला. शुक्रवारी (दि. २५) रात्री आठ वाजता सरदार पटेल रोडवरील कसाई मशिदीजवळ घडलेल्या या प्रसंगातून मनमाडकरांनी परस्परांच्या श्रद्धेचा सन्मान करत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला. शहरातील मानाचे व सर्वात जुने आझाद गणेश मंडळ, ज्याला सुमारे ८६ वर्षांची परंपरा आहे, त्याची विसर्जन मिरवणूक कसाई मशिदीजवळ आली होती. अजान व नमाजाची वेळ लक्षात येताच कार्यकर्त्यांनी मिरवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला. नमाज पूर्ण झाल्यानंतर पारंपरिक वाद्यांचा नाद सुरू झाला आणि मिरवणूक जुन्या परंपरेनुसार, परवानगी असलेल्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे शांततेत पुढे सरकली. पोलिस निरीक्षक विजय करे व त्यांच्या पथकानेही या प्रसंगी संयमाने परिस्थिती हाताळली. या घटनेचे शहरभर कौतुक होत असून, असा सलोखा पुढील पिढ्यांसाठी परंपरा बनावा, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. शहरातील गणेशभक्तांनी श्रद्धेला श्रद्धेने दिला मान दुसऱ्याच्या प्रार्थनेची वेळ आली म्हणून स्वतःच्या उत्सवाचा आवाज काही काळ थांबवणे, हा सर्वधर्मसमभावाचा प्रत्यक्ष वस्तुपाठ ठरला. लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठांनी हा प्रसंग अनुभवला. त्यामुळे सलोख्याचा संदेश भाषणातून नव्हे, तर कृतीतून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला. धार्मिक सलोखा केवळ भाषणे किंवा सोशल मीडिया संदेशांपुरता मर्यादित नसतो. सण आणि प्रार्थनेच्या वेळा एकाच ठिकाणी आल्यावर परस्परांना जागा देणे, संयम राखणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे यातून सामाजिक विश्वास दृढ होतो. मनमाडमधील या घटनेने त्याचे उदाहरण समोर ठेवले आहे.
Source link
नमाजासाठी थांबली विसर्जन मिरवणूक:मनमाडकरांनी जपला सामाजिक सलोखा; आझाद मंडळाचा सर्वधर्मसमभावाचा संदेश