![]()
आजवर आपण पशुवैद्यकीय दवाखाना, विविध आजारांवर औषधोपचार करणारे दवाखाने बघितले आहेत. मात्र, पुस्तकांचा दवाखाना ही संकल्पना निश्चितच वेगळी आहे. तिवसा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा, निबोरा (देलवाडी,) येथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा अनोखा दवाखाना सुरू केला आहे. जिल्ह्यात तसेच तिवसा तालुक्यात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी ही एकमेव शाळा असण्याची शक्यता शाळेकडून वर्तवण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी गार्गी थोटे, अनुष्का गोहोत्रे, अंजली मनवर, गौरी मुंदाने, ईश्वरी जढाये, पूर्वा पोहेकर, आदित्य तालन, सोहम गोलाईत, सर्वेश दिघडे या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. शाळेतील बाल ग्रंथालयामधील फाटलेली, कव्हर निघालेली अथवा जीर्ण झालेली पुस्तके विद्यार्थी शोधून काढतात आणि त्यांच्यावर ‘उपचार’ करून (दुरुस्त) पुस्तके पुन्हा वापरण्या योग्य बनवतात. या ‘पुस्तकांच्या दवाखान्यात’ पुस्तकांच्या दुरुस्तीसाठी कात्री, डिंक, टेप, सुई-दोरा, फेविकॉल, चितपट्टी आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. या साहित्याच्या मदतीने विद्यार्थी स्वतः पुस्तकांची दुरुस्ती करतात. एवढेच नव्हे, तर शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे, दस्तऐवज आणि विविध रजिस्टर यांनाही विद्यार्थी कव्हर लावण्याचे काम करतात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पुस्तकांची काळजी घेणे, जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करणे तसेच उपलब्ध साधनसामग्रीचे महत्त्व समजत आहे. पुस्तक फाटले म्हणून ते टाकून न देता त्याची दुरुस्ती करून पुन्हा वापरण्याचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे. ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमामुळे मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्यासोबतच वाचनाची आवड आणि पुस्तकांविषयीची आपुलकी वाढण्यास मदत होत आहे. ‘पुस्तकांचा दवाखाना’ हा उपक्रम सध्या तिवसा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पुस्तकांचा दवाखाना’ नेमका कसा? देलवाडी निबोरा शाळेतील बाल ग्रंथालयात फाटलेली, कव्हर निघालेली किंवा जीर्ण झालेली पुस्तके या काही विद्यार्थ्यांकडून शोधली जातात. त्यानंतर कात्री, डिंक, टेप, सुई-दोरा, फेविकॉल व चितपट्टी यांच्या मदतीने पुस्तकांची दुरुस्ती केली जाते. इतरही विद्यार्थी त्यांची जीर्ण झालेली पुस्तके दुरुस्तीसाठी आणतात. यातून विद्यार्थ्यांना वाचना सोबतच जपणूक, पुनर्वापर आणि जबाबदारीचे धडे मिळत आहेत.
Source link
निंबोऱ्याच्या विद्यार्थ्यांनी उघडला पुस्तकांचा दवाखाना:जीर्ण पुस्तकांना नवसंजीवनी, विद्यार्थीच करतात दुरुस्त, अनोख्या उपक्रमाची चर्चा