![]()
सिंधुदुर्गातील कथित 900 कोटी रुपयांच्या शेतजमिनीच्या व्यवहारावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल येऊ द्यावा, असे राणे यांनी म्हटले आहे. ‘चुकीचं काहीही केलेलं नाही’, असे स्पष्ट करत त्यांनी राऊतांनी केलेल्या आरोपांवर अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी चौकशीचा अहवाल पाहण्याचे आवाहन केले. हिवाळी अधिवेशनात अहवाल मांडणार कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या जमीन व्यवहाराची चौकशी सुरू आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहवाल हिवाळी अधिवेशनात सभागृहासमोर मांडला जाईल, असे नितेश राणे यांनी सांगितले. चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते सभागृहात मांडले जाईल आणि कोकणात कोणी चुकीचे केले असल्याचे समोर आल्यास संबंधितांवर कारवाई होईल, अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. उपलब्ध माहितीनुसार, चौकशी समितीचा अहवाल आगामी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्याची तयारी आहे. ‘कुणीही चुकीचं केलं असेल तर शिक्षा’ या प्रकरणात कोणाचाही सहभाग आढळला तरी कारवाईपासून सरकार मागे हटणार नाही, असे राणे यांनी म्हटले. ‘कोकणात जर कोणीही काही चुकीचं केलं असेल तर त्याला शिक्षाच होणार’, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे चौकशीच्या निष्कर्षानंतरच या प्रकरणातील आरोपांमध्ये तथ्य किती आहे, हे स्पष्ट होईल. संजय राऊतांवर जोरदार टीका दरम्यान, राणे यांनी संजय राऊतांच्या आरोपांच्या पद्धतीवरही टीका केली. राऊत हे अनेकदा घाईघाईने आरोप करतात, असा दावा करत अहवाल समोर आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे ९०० कोटींच्या कथित जमीन व्यवहारावरून राऊत आणि राणे यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. नेमके काय होते संजय राऊतांचे आरोप? संजय राऊत यांनी नुकताच आरोप केला होता की, सिंधुदुर्गात सुमारे ९०० कोटी रुपयांचा शेतजमिनीचा मोठा घोटाळा झाला आहे. तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमधील धनिकांना शेतकरी नसतानाही बेकायदेशीररीत्या जमिनी विकल्या गेल्याचा त्यांचा दावा होता. यात सिंधुदुर्गातील मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा थेट सहभाग असून संबंधित मंत्री परप्रांतीय व्यावसायिकांचे भागीदार असल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला होता. तसेच, या व्यवहाराची महसूल विभागाकडून गेले तीन वर्षे सुरू असलेली चौकशी आणि कोकणातील कथित जंगलतोड यावर बोट ठेवत त्यांनी शिवसैनिकांसह प्रत्यक्ष पाहणी करण्याचा इशारा दिला होता. राऊतांच्या या दाव्यांवरून आता नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ————— हेही वाचा.. संजय राऊतांकडून FDA कारवाईचे कौतुक:मात्र अधिकाऱ्यांवर वसुलीचे गंभीर आरोप; तुकाराम मुंढेंकडे तातडीच्या चौकशीची मागणी अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईचे राज्यभरात कौतुक होत असले, तरी या कारवाईच्या नावाखाली एफडीएचे अधिकारी हॉटेल आणि क्विक कॉमर्स व्यावसायिकांची लूट करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी तुकाराम मुंढे यांना थेट पत्र लिहून अधिकाऱ्यांच्या ‘रेट कार्ड’ची पोलखोल केली असून, या पत्राची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवली आहे. सविस्तर वाचा
Source link