Headlines

लोणीकंदमध्ये स्टोन क्रशरमध्ये अडकून 17 वर्षीय कामगाराचा मृत्यू:अल्पवयीनाला कामावर ठेवल्याप्रकरणी मालकावर गुन्हा




स्टोन क्रशरमध्ये (खडी मशीन) अडकून एका १७ वर्षीय कामगार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. अल्पवयीनाला कामावर ठेऊन त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करुन घेणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी स्टोन क्रशर मालकाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रिन्स विजयसिंग धुर्वे (वय १७) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी साईराम स्टोन क्रशरचे मालक दिलीप संभाजी शिळीमकर (वय ४०, रा. साईसमृद्धी अपार्टमेंट, वाघोली, अहिल्यानगर रस्ता), सत्यजीत अशोक जाना (वय ३५, रा. स्पंदन स्पर्श सोसायटी, वाघोली, अहिल्यानगर रस्ता), अमित भगवान अकोलकर (रा. व्हिजन प्रिसा अपार्टमेंट, रावेत, पिंपरी-चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार अजित कुऱ्हे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद भागात साईराम स्टोन क्रशर आहे. तेथे प्रिन्स धुर्वे काम करत होता. धुर्वे हा अल्पवयीन होता. त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करुन घेण्यात येत होते. १२ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास स्टोन क्रशर यंत्रात अडकून धुर्वे गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रुग्णालयाकडून पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. स्टोन क्रशरच्या मालकांनी धुर्वे याला सुरक्षाविषयक साधने पुरवली नसल्याचे चौकशीत उघड झाले. अल्पवयीनाकडून धोकादायक पद्धतीने काम करुन घेणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार जगताप तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *