Headlines

संकट मोठंय, पण डगमगू नका!:कृषीमंत्री भरणे म्हणाले- केंद्राची वाट न पाहता राज्य सरकार मदत करणार




राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. उभी पिके जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. “हे निसर्गाचे संकट आहे, मात्र या कसोटीच्या काळात शेतकऱ्यांनी डगमगून जाऊ नये. राज्य सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करू,” अशी ग्वाही भरणे यांनी दिली आहे. सरकार तुमच्या बरोबर आहे दुष्काळी परिस्थितीबाबत माध्यमांशी संवाद साधताना कृषीमंत्री भरणे म्हणाले की, “पावसात खंड पडल्याने पिके जळाली आहेत हे नक्कीच एक मोठे संकट आहे. पण हे निसर्गाचे संकट असून ते कुठल्या मनुष्यामुळे निर्माण झालेले नाही. आपल्याला या संकटाचा सामना करावाच लागेल. या अडचणीच्या काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. गावागावांत जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी जाणून घेत शासनाच्या वतीने रोजगार, शेती आणि पशुधनाच्या बाबतीत सर्वतोपरी मदत केली जाईल.” केंद्राची वाट न पाहता मदत दुष्काळी पंचनाम्यांबाबत बोलताना ते म्हणाले की, “सध्या सगळीच पिके जळालेली आहेत. पण ‘एनडीआरएफ’ची मदत मिळवायची असेल, तर काही कागदपत्रे आणि नियम-अटी पूर्ण कराव्या लागतात. ती प्रक्रिया आपण करत आहोत. मात्र, केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता राज्य सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करेल.” ‘आम्हीही शेतकऱ्याचीच मुलं आहोत’ पंचनामे होण्याआधीच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, या मागणीवर उत्तर देताना भरणे म्हणाले, “कोणतीही मदत देताना प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. शनिवारीच दुष्काळाची अधिसूचना काढण्यात आली आहे, आणि आज सोमवार आहे. आम्हाला थोडा वेळ द्या. आम्हीही शेतकऱ्याचीच मुले आहोत. शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या अडचणी आम्हालाही माहीत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर मदत दिली जाईल.” खरीप गेला, आता रब्बीची आशा हवामान विभागाच्या अंदाजावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर कृषीमंत्री म्हणाले की, “आपण हवामान विभागावरच अवलंबून असतो. एल निनोचे संकट राज्यावर आहेच आणि उन्हाळ्यातही कडक ऊन पडेल असा अंदाज आहे. खरीप हंगाम तर पूर्णपणे वाया गेला आहे, पण अजूनही परतीच्या पावसाची आशा आहे. आपण परमेश्वराला साकडं घालू की पाऊस पडू दे, जेणेकरून रब्बी हंगामात कमी पाण्यावर येणारी पिके तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडतील.” —————- हेही वाचा.. नैसर्गिक संसाधनांवर पहिला हक्क कुणाचा?: काँग्रेसचा राज्य सरकारला सवाल; शेतकऱ्यांच्या वाट्याला दुष्काळ, अन् डेटा सेंटर्सला मात्र 24 तास पाणी आणि वीज राज्यात 265 तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ जाहीर झालेला असताना आणि बळीराजा पाण्यासाठी टाहो फोडत असताना, राज्य सरकारच्या धोरणावरून काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. ‘एकीकडे शेतकऱ्यांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुसरीकडे डेटा सेंटर्सच्या (Data Centers) वाट्याला मुबलक पाणी आणि वीज, हा कुठला विकास?’ असा घणाघाती सवाल काँग्रेसने राज्य सरकारला विचारला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *