Headlines

गणपती विसर्जनाच्या गर्दीत चोरी करणाऱ्या 15 जणांना अटक:35 लाखांचा मुद्देमाल जप्त, 22 गुन्हे उघडकीस




गणपती विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा घेऊन भाविकांचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या १५ संशयितांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत चोरीचे २२ गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गणेशोत्सवादरम्यान विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर येतात. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने मिरवणूक मार्गावरील घटनांची माहिती गोळा केली. चोरी झालेल्या नागरिकांच्या तक्रारी आणि तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून संशयितांना ताब्यात घेतले. 22 गुन्ह्यांचा या कारवाईत उलगडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १९ चोरीचे गुन्हे उघडकीस आले. याशिवाय फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सोनसाखळी चोरीचे दोन आणि चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक गुन्हा उघडकीस आला. अशा एकूण २२ गुन्ह्यांचा या कारवाईत उलगडा झाला आहे. जप्त मुद्देमालात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या, मंगळसूत्रे, पर्समधील सोन्याचे दागिने आणि मोबाइल फोन यांचा समावेश आहे. गर्दीत चोरी झाल्याचे अनेकदा काही वेळाने लक्षात येते. त्यामुळे मिरवणुकीतील तक्रारींचा मागोवा घेणे आणि संशयितांचा शोध घेणे, ही तपास पथकासमोरील आव्हाने होती. पथकाने वेगवेगळ्या घटनांचा तपास करून संशयितांपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांनी सांगितले. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश कारके आणि तपास पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून जप्त केलेल्या वस्तूंची संबंधित तक्रारींशी पडताळणी करण्यात येत आहे. चोरीस गेलेला उर्वरित मुद्देमाल तसेच या प्रकरणांत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास सुरू आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *