Headlines

नियमित कर्ज फेडूनही कर्जमाफी नाही:हतबल शेतकऱ्याने विष प्राशन करत संपवली जीवनयात्रा, अमरावती हादरले!




अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. गजानन अलोने (वय 52) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, ते धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर येथील रहिवासी होते. दोन दिवसांपूर्वी स्वतःच्याच शेतात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असून, या दुःखद घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गजानन अलोने यांच्या कुटुंबाकडे केवळ दीड एकर सामूहिक शेती होती आणि त्यांच्यावर कर्जाचा मोठा बोजा होता. त्यांच्यावर बँक ऑफ महाराष्ट्रच्या चिंचोली शाखेचे सुमारे 1 लाख 40 हजार रुपयांचे पीककर्ज आणि त्यासोबतच गृहकर्जही होते. अलोने नियमितपणे कर्जाची परतफेड करत होते, मात्र तरीही कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव आले नाही. आधीच निसर्गाची अवकृपा आणि त्यात कर्जमाफी न मिळाल्याने हतबल होऊन त्यांनी मृत्यूला जवळ केले. एका क्षणात या संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपला मृत शेतकऱ्याच्या पश्चात त्यांचे आई-वडील, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी ते दोघेही पती-पत्नी शेतात गेले होते. शेतातील पिकाची दयनीय अवस्था आणि डोक्यावरील कर्जाची चिंता यामुळे ते अस्वस्थ होते. घरी परतल्यानंतर गजानन अलोने पुन्हा एकटेच शेतात गेले आणि तिथेच त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. एका क्षणात या संपूर्ण कुटुंबाचा आधार हरपला आहे. ठाकरे गटाचा ‘शिवसेना मदत कक्ष’ एकीकडे दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असताना, शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी अमरावतीत शिवसेना ठाकरे गट मैदानात उतरली आहे. अमरावती शहरातील बाजार समितीजवळ शेतकऱ्यांसाठी ‘शिवसेना मदत कक्ष’ सुरू करण्यात आला असून, खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे. दुष्काळावरून केवळ राजकारण न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी हा एक वेगळा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या मदत कक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमाफी, शासकीय मदत आणि विविध सरकारी योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी सोडवल्या जाणार आहेत. प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे केंद्र काम करेल. अमरावतीतून सुरू झालेला हा उपक्रम भविष्यात राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही राबवला जाणार आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला या मदत केंद्रांचा कितपत फायदा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *