Headlines

दुष्काळग्रस्तांना पुरेशी मदत द्या, अन्यथा संघर्ष अटळ!:शरद पवारांचा सरकारला इशारा; विलीनीकरणाच्या चर्चेवरही स्पष्ट भूमिका, म्हणाले- आम्ही कुणासोबतच जाणार नाही




राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या दुष्काळ निवारण धोरणातील त्रुटींवर सडकून टीका केली. तसेच, आगामी काळात निवडणुकांचे निकाल फिरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर होऊ शकतो, असा गंभीर इशारा देत कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. याच बैठकीत त्यांनी पक्षाच्या विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. दुष्काळी मदतीतील त्रुटी आणि सरकारवर टीका राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असला तरी सरकारच्या मदतीत अनेक कमतरता असल्याचे पवार म्हणाले. “सरकारने शेती कर्जाच्या वसुलीला स्थगिती दिली आहे. याचा अर्थ कर्ज माफ केलेले नाही. कर्ज डोक्यावर तसेच राहील आणि शेतकरी पुढील वर्षी थकबाकीदार होईल, ज्यामुळे त्याला नवीन कर्ज मिळणार नाही. फळबागांना मदत जाहीर केली आहे, पण त्यात जळगाव, परभणी, नांदेडमध्ये घेतल्या जाणाऱ्या केळी पिकाचा समावेश नाही. तसेच, शेतमजूर, दलित, आदिवासी या घटकांना या मदतीतून वंचित ठेवता येणार नाही,” असे म्हणत पवारांनी या त्रुटी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दोन पत्रे पाठवल्याचे सांगितले. प्रश्न न सुटल्यास रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मनमोहन सिंग यांच्या काळातील ‘तो’ किस्सा दुष्काळावर निर्णय कसे घ्यावेत, याचा दाखला देताना पवारांनी त्यांच्या केंद्रीय कृषीमंत्री पदाच्या काळातील आठवण सांगितली. “दुष्काळ पडला असताना तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दुष्काळाचे सर्व निर्णय घेण्याचे आणि त्यासाठी मंत्रिमंडळाची संमती न घेण्याचे विशेष अधिकार मला दिले होते. त्यावेळी जालन्यात जाऊन मोसंबीच्या बागा वाचवण्यासाठी आम्ही एका रात्रीत एकरी २५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता आणि शेकडो एकर पिके वाचवली होती. आज या सरकारला तशाच धाडसी निर्णयांची गरज आहे,” असे पवार म्हणाले. निवडणुकीत ‘AI’चा धोका बैठकीत शरद पवारांनी तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावावर भाष्य केले. बारामतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) संस्थेतील एक किस्सा सांगताना ते म्हणाले, “मी तिथे गेलो तेव्हा दोन रोबोट उभे होते. एकाने मला खडाक करून सॅल्यूट मारला आणि मी परत फिरल्यावर तो माझ्या मागे चालत आला. रोबोटचा उपयोग अनेक प्रश्न सोडवण्यासाठी होत आहे, पण त्याचे धोकेही मोठे आहेत. मला काळजी ही आहे की, ही कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने तुमच्या निवडणुकीचे निकाल कसे फिरवायचे, यासाठीही वापरली जातील. अमेरिका, युरोपमध्ये याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या तंत्रज्ञानाविषयीचे लेख वाचून स्वतःची मानसिकता तयार करावी, अन्यथा संघटनेला मोठी किंमत मोजावी लागेल.” विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम भाषणाच्या शेवटी शरद पवारांनी पक्षात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांवर स्पष्ट शब्दांत पडदा टाकला. “राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष आहे. आम्ही कुणाच्याही जवळ जाणार नाही किंवा इतर कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. ज्यांना यायचे असेल त्यांनी आमच्यात यावे, आम्ही कुणाच्यात जाणार नाही. हा निर्णय पक्का असून, आपल्याला आता थेट लढाई द्यायची आहे,” असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. ——————– ही बातमी पण वाचा.. नैसर्गिक संसाधनांवर पहिला हक्क कुणाचा?: काँग्रेसचा राज्य सरकारला सवाल; शेतकऱ्यांच्या वाट्याला दुष्काळ, अन् डेटा सेंटर्सला मात्र 24 तास पाणी आणि वीज राज्यात 265 तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ जाहीर झालेला असताना आणि बळीराजा पाण्यासाठी टाहो फोडत असताना, राज्य सरकारच्या धोरणावरून काँग्रेसने सरकारला धारेवर धरले आहे. ‘एकीकडे शेतकऱ्यांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुसरीकडे डेटा सेंटर्सच्या (Data Centers) वाट्याला मुबलक पाणी आणि वीज, हा कुठला विकास?’ असा घणाघाती सवाल काँग्रेसने राज्य सरकारला विचारला आहे. काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करत सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *