Headlines

गोरेगाव शौचालय मृत्यू प्रकरण:ड्रेनेजमध्ये सोडलेला विषारी वायू ठरला मृत्यूला कारणीभूत; गाळामालकाला अटक, मॅनेजर फरार




गोरेगाव पूर्वेत सार्वजनिक शौचालयात झालेल्या दोन तरुणांच्या मृत्यूप्रकरणी वनराई पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून तपासाचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शौचालयाच्या शेजारील गाळ्यातील रसायनांमुळे ड्रेनेज पाईपलाईनमध्ये तयार झालेल्या विषारी वायूने या तरुणांचा बळी घेतल्याचे पोलिस तपासात आणि एफआयआरमध्ये निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून गाळामालक नवीनचंद्र भाई चावडा याला अटक केली आहे. तर, रसायनांचा बेकायदेशीर वापर करणारा गाळा चालक रामधनी यादव आणि त्याचा मॅनेजर सध्या फरार असून वनराई पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत. गोरेगाव पूर्वेकडील मृणालताई उड्डाणपुलाखाली असलेल्या राम मंदिर रेल्वे स्टेशनजवळील सार्वजनिक शौचालयात रविवारी (27 सप्टेंबर) रात्री अडीच वाजताच्या सुमारास ही भीषण घटना घडली. भाविक उर्फ आर्यन अनिल देसाई आणि प्रभाकर जगदीश धीवर हे दोन तरुण शौचास गेले असता, गुदमरून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे, या विषारी वायूची तीव्रता इतकी होती की, शौचालयाच्या बाहेर असलेल्या एका मांजराचाही या वायूमुळे जागीच मृत्यू झाला. ड्रेनेज लाईनमध्ये विषारी रसायनांचा विसर्ग शौचालयाशेजारी असलेल्या पूजा गॅरेज, शिवशंकर नगर-2 येथे ‘साई इलेक्ट्रोप्लेटर्स’ या कंपनीचा गाळा (क्रमांक 19 व 20-ए) आहे. या कंपनीतून वापरलेले विषारी केमिकल थेट चेंबरच्या आणि ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये टाकण्यात आले. हे घातक रसायन ड्रेनेज पाईपलाईनमधून वाहत आल्याने त्याचा विषारी वायू शौचालयात मोठ्या प्रमाणावर पसरला. हाच वायू श्वासावाटे शरीरात गेल्याने या दोन तरुणांचा मृत्यू ओढवला. घटनास्थळावरील विदारक दृश्य शौचालयाचा दरवाजा आतून बंद असल्याने तो उघडला जात नव्हता. अखेर जोर लावून दरवाजा उघडला असता, भाविक देसाई हा आत बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला. तिथे विषारी वायूचा इतका उग्र दर्प येत होता की, दरवाजा उघडणाऱ्या विपुल नावाच्या व्यक्तीलाही तिथेच उलटी झाली. आजूबाजूला असलेल्या लोकांनी तातडीने रस्त्यावरून जाणारी एक कार थांबवून त्यातून तरुणाला रुग्णालयात हलवण्याची धडपड केली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू बेशुद्ध अवस्थेत सापडलेला भाविक देसाई आणि त्याचा मित्र प्रभाकर धीवर या दोघांनाही उपचारासाठी तातडीने जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, विषारी वायू शरीरात मोठ्या प्रमाणावर भिनल्यामुळे तेथील डॉक्टरांनी तपासून दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच (ब्रॉट डेड) मृत घोषित केले. मालक आणि चालकाचा भयंकर निष्काळजीपणा रहिवासी भागात विषारी रसायनांचा वापर केल्यास मानवी जीविताला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, याची पूर्ण जाणीव असतानाही गाळामालक नवीनचंद्र चावडा याने हा गाळा या बेकायदेशीर व्यवसायासाठी भाडेतत्त्वावर दिला होता. तर गाळा चालक रामधनी यादव याने कोणतीही खबरदारी न घेता अत्यंत हलगर्जीपणाने या विषारी रसायनांची विल्हेवाट लावली, ज्याच्या परिणामामुळे दोन निष्पाप तरुणांना आपला जीव गमवावा लागला. आरपीआय आठवले गटाकडून आंदोलनाचा इशारा या संतापजनक आणि निष्काळजीपणाच्या घटनेनंतर आरपीआय (आठवले गट) आक्रमक झाला आहे. त्यांच्या एका शिष्टमंडळाने वनराई पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. गाळा मालक आणि चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून उर्वरित फरार आरोपींना तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी आरपीआयने केली आहे. जर येत्या 24 तासांत वनराई पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही, तर पोलिस ठाण्याबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. मुंबईत मोठी खळबळ!:सार्वजनिक शौचालयात केमिकलच्या वासाने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू, राम मंदिर परिसरातील धक्कादायक घटना मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातील राम मंदिर परिसरात एका सार्वजनिक शौचालयात एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. पारसी पंचायत गेटसमोरील आणि मृणालताई उड्डाणपुलाजवळील या सार्वजनिक शौचालयात गेलेल्या दोन तरुणांचा केमिकलच्या उग्र वासामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *