![]()
निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करू नये, अशी भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मांडली. काँग्रेसच्या निवेदनानुसार, मतदार याद्यांमधून पात्र मतदारांची नावे वगळणे, निवडणुकीच्या काळात पात्र उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई करणे तसेच सत्ताधारी पक्षाशी संबंधित उमेदवारांना लाभ मिळेल अशा पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांमध्ये विविध निर्णयांवर मतभेद निर्माण झाल्याचा दावाही काँग्रेसने केला. गेल्या दहा महिन्यांत १४ वेळा असहमती नोंदविण्यात आल्याचा उल्लेख काँग्रेसने निवेदनात केला आहे. निवडणूक आयोगासारखी घटनात्मक संस्था सत्ताधाऱ्यांच्या प्रभावापासून मुक्त असणे आवश्यक आहे. आयोगाच्या कामकाजावर नागरिकांचा विश्वास कायम राहणे लोकशाहीसाठी महत्त्वाचे आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते मोहन जोशी, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक अरविंद शिंदे, ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवाभाऊ मंत्री, नगरसेविका आसिया मणियार, नगरसेविका सुमय्या नदाफ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती शिंदे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, अक्षय जैन यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलकांनी घोषणाबाजी करीत निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध केला.
Source link
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे आंदोलन:मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यात निदर्शने