Headlines

काळजातल्या कविता मानवी जीवनाचे औषध- प्रशांत मोरे:प्रांत, भाषा बदलली तरी माणसाच्या भावना मात्र त्याच राहतात‎




कविता ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती माणसाच्या काळजाला भिडते आणि जीवनाला दिशा देते. काळजातून उमटलेल्या कविता या मानवी जीवनाचे औषध आहेत. त्यामुळे हत्यार घेऊन फिरण्यापेक्षा पेन घेऊन फिरा, कवितेतून व्यक्त व्हायला शिका, असा संदेश लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी विद्यार्थ्यांना दिला. कर्मवीर जयंती सप्ताह व व्याख्यानमालेनिमित्त महात्मा गांधी माध्यमिक, उच्च माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, सो. ना. सोनमाळी कन्या विद्यामंदिर व दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने २१ ते २८ सप्टेंबरदरम्यान शारदाबाई पवार सभागृहात ‘कर्मवीर व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत ‘काळजातल्या कविता’ या विषयावर लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांचे व्याख्यान झाले. प्रा. मोरे यांनी काव्यमय शैलीतून महाराष्ट्रातील विदर्भ, खानदेश, कोकण, मराठवाडा आदी विविध प्रांतांतील बोलीभाषांमधील कविता सादर केल्या. ‘प्रांत आणि भाषा बदलली तरी भावना त्याच राहतात,’ असे सांगत त्यांनी विविध बोलींमधील कवितांमागील मानवी भावविश्व उलगडले. स्वतः संगीत व चाल दिलेल्या कवितांच्या सादरीकरणातून त्यांनी विद्यार्थ्यांना दीड ते दोन तास मंत्रमुग्ध केले. आईच्या कष्टांची कदर करा, तिचे उपकार फेडण्यापलीकडचे आहेत, जीवन सुंदर आहे; मात्र ते तालात जगले पाहिजे, कविता आतून जन्माला येते, प्रेमात समर्पणाची भावना जपली पाहिजे, संपत्तीचा माज करू नका, असेही त्यांनी सांगितले. ‘आपले आई-वडील हेच मोठे हिरो आहेत. घराच्या चार भिंतींच्या आत मोठी जादू आहे, त्यामुळे आपल्या घरात डोकवा,’ असे आवाहनही त्यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *