![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा असतानाच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदतीबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. पिकांचे पंचनामे आणि संपूर्ण अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आजच्या आज मदत जाहीर केल्यास काही शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे परिस्थितीचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मदतीसाठी घाई नको, अचूक पंचनामे आवश्यक यवतमाळ दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी सरकारच्या मदतीची प्रक्रिया स्पष्ट केली. ते म्हणाले, “दुष्काळी मदतीतून एकही पात्र शेतकरी सुटणार नाही, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, कुणीतरी मागणी केली म्हणून आजच्या आज मदत जाहीर करून टाका, असे चालत नाही. घाईघाईत मदत जाहीर केली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे संपूर्ण रिपोर्ट येणे आवश्यक आहे. तूर, कापूस, सोयाबीन, हळद, संत्री आणि बागायती पिकांच्या नुकसानीचे निकष वेगळे आहेत. या सर्वांचे अचूक पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच मुख्यमंत्री अधिकृत मदत जाहीर करतील.” दुष्काळाचे राजकारण नको विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, दुष्काळाचे राजकारण करणे अत्यंत चुकीचे आहे. दुष्काळाच्या झळा शेतकरी आणि शेतमजुरांना बसत आहेत, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या संकटाचा सामना केला पाहिजे. अचूक पंचनामे व्हावेत यासाठीच माझा हा राज्यव्यापी दौरा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पवारांच्या पत्रावर प्रतिक्रिया शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत विचारले असता, बावनकुळेंनी थेट शब्दांत उत्तर दिले. “विरोधी पक्ष म्हणून पत्र देणे हे त्यांचे कामच आहे. पण केवळ पवारांनी पत्र दिले म्हणून आम्ही मदत करत आहोत, असे नाही. आमच्याकडे विविध पक्षांच्या नेत्यांची आणि आमदारांची दोन हजारांहून अधिक पत्रे आली आहेत. मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करत आहेत. जे तालुके दुष्काळाच्या यादीतून सुटले आहेत, त्याचाही अभ्यास करून न्याय दिला जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांना १२ तास वीज देणार दुष्काळात पिके जगवण्यासाठी सिंचनाची नितांत गरज असून, त्यासाठी महावितरणला शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. पुरेशा पाण्यावर शेतकरी सिंचन करू शकतील. मात्र, जर वीज मिळण्यात काही अडचणी येत असतील, तर त्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत गंभीर चर्चा करून मार्ग काढला जाईल, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. ————– ही बातमी पण वाचा.. यायचं असेल तर आमच्यासोबत या:शरद पवार म्हणाले- आम्ही कोणासोबत जाणार नाही; राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण पुन्हा चर्चेत ‘आम्ही कोणासोबत जाणार नाही. यायचं असेल तर आमच्या या,’ असा खणखणीत संदेश देत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या सर्व चर्चा फेटाळून लावल्यात. तसेच आपली वाटचाल पुन्हा तेवढ्याच तडफेने सुरू राहील, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी काळात निवडणुकांचे निकाल फिरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या दुष्काळ निवारण धोरणातील त्रुटींवर सडकून टीका केली. सविस्तर वाचा
Source link
आजच्या आज दुष्काळी मदत जाहीर होणार नाही:पंचनामे-संपूर्ण अहवालानंतरच मदतीचा निर्णय; दुष्काळाचे राजकारण नको- बावनकुळे