“मराठा आरक्षणाचा शत्रू आतून पूर्णपणे एकवटला असून समाजाविरोधात अत्यंत मोठे षडयंत्र रचले जात आहे. मी आज शांत आहे याचा अर्थ मी संपलो किंवा बॅकफूटवर गेलो असा नाही. माझ्यावर कितीही वैयक्तिक हल्ले करा, आरोप करा; मी समाजाच्या लेकरांना आरक्षण मिळवून दिल्याशि
.
छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर डिस्चार्ज मिळण्यापूर्वी घेतलेल्या सविस्तर पत्रकार परिषदेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी अंतर्गत विरोधक, मातंग समाजाचे उपवर्गीकरण, राज्यातील भीषण दुष्काळ, नेत्यांची दुटप्पी भूमिका आणि दसरा मेळाव्याच्या नियोजनावर परखड भाष्य केले.
विध्वंसक होण्यापेक्षा विद्वान व्हा; अंगावरचा वळ आणि अपमान विसरायचा नाही
समाजाला संयम आणि रणनीतीचा सल्ला देताना मनोज जरांगे म्हणाले, “आपण लढाईच्या अत्यंत निर्णायक टप्प्यावर आणि विजयाच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. शत्रूला आपल्याला विचलित करायचे आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी विध्वंसक होण्यापेक्षा विद्वान होणे गरजेचे आहे. क्षत्रिय धर्म सोडायचा नाही, पण संयम ठेवून अचूक वेळी घाव घालायचा असतो.”
गुलामगिरीपेक्षा मरण पत्करू
“मासाहेब जिजाऊंनी बांगड्या असणाऱ्या मनगटातही अत्याचाराविरुद्ध तलवारी उचलण्याचे बळ भरले होते. आज आपल्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. लढताना यश मिळवताना मरण आले तरी चालेल, पण शरण जाऊन गुलाम होणार नाही. अंगावर उमटलेले अन्यायाचे वळ आणि झालेला अपमान समाजाने कधीही विसरता कामा नये.”

मातंग समाज उपवर्गीकरण- “भावा-भावांमधील विषय, आधी पूर्ण समजून घेणार”
अनुसूचित जातींच्या (SC) 13 टक्के आरक्षणाच्या ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली. “मातंग समाजाच्या उपवर्गीकरणाचा विषय नेमका काय आहे, तो मी आधी कायदेशीर आणि सामाजिक दृष्टीने समजून घेणार आहे. हा एका अर्थाने भावा-भावांमधील विषय आहे. माहिती नसताना कशातही उडी मारणे योग्य नाही. पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी यावर 100 टक्के माझी भूमिका स्पष्ट करेन.”
मला औरंगजेब म्हणा किंवा शिव्या द्या, फरक पडत नाही
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या काही समन्वयकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना ते म्हणाले, “काही लोक म्हणतात जरांगे बॅकफूटवर गेले, कुणी औरंगजेबाची उपमा दिली. मला शिव्या दिल्या तरी फरक पडत नाही. मी तीन महिने कोणाच्याही टीकेला उत्तर देणार नाही. माझा संपूर्ण संसार जळून राखरांगोळी झाला आहे, मी वनवास भोगतोय तो केवळ गरिबांच्या लेकरांसाठी. त्यामुळे अंतर्गत वादात माझी ताकद वाया घालवणार नाही.”
“कुणबी नोंदी आणि एसईबीसीच्या माध्यमातून आज समाज मोठ्या प्रमाणावर आरक्षणात आला आहे. उर्वरित हक्काचे आरक्षणही मी मिळवून देणारच. जे आज माझ्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत आहेत, फोन करून दबाव आणत आहेत, त्यांची सर्व नावे वेळ आल्यावर जाहीर करेन.”
शेतकऱ्याला 1 लाख हेक्टरी द्या, अन्यथा चाक फिरू देऊ नका!
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “नेते छानपैकी आंघोळी करून, अंगावर सेंट मारून शेताच्या बांधावर येतात आणि तिथे शेतकरी रडतो आहे. मंत्र्यांच्या बंगल्याच्या स्लॅबवर स्विमिंग पूल आहेत आणि शेतकऱ्याच्या जनावरांना प्यायला पाणी नाही. ही कसली व्यवस्था?”
आत्महत्या बंद करा, रस्त्यावर उतरा
“शेतकऱ्याने गळफास घेतल्यावर सरकार दीड लाख रुपये फेकून मोकळे होते. शेतकऱ्यांनी लिंबाच्या झाडाला फाशी घेणे बंद केले पाहिजे. ज्या दिवशी शेतकऱ्यांनी ठरवले की हेक्टरी १ लाख रुपये मदत मिळाल्याशिवाय राज्यात एकही गाडीचे चाक फिरू देणार नाही, त्या दुसऱ्याच दिवशी सरकार तुमच्या दारात पैसे आणून टाकेल.”
नेते खाजगीत म्हणतात आम्ही पक्षामुळे मोठे झालो; मतदारांना विसरले
मराठा समाजातील प्रस्थापित नेत्यांवर निशाणा साधताना ते म्हणाले, “जेव्हा समाजातील लोक नेत्यांना विचारतात की तुम्ही आरक्षणावर का बोलत नाही, तेव्हा हे नेते खाजगीत सांगतात की आम्ही जे काही आहोत ते आमच्या पक्षामुळे आणि पक्षश्रेष्ठींमुळे आहोत. अरे, तुम्ही गरिबांच्या मतांमुळे मोठे झाला आहात! चार वेळा पडलात तर पक्ष तिकीटही देत नाही, हे लक्षात ठेवा. अशा समाजविरोधी नेत्यांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे.”
दसऱ्याला नारायणगडावर दर्शनासाठी एकत्र या!
आगामी दसऱ्याच्या नियोजनाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले. “हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. तसेच, येत्या विजयादशमीला (दसऱ्याला) मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश, कोकण आणि मुंबई-पुण्यातील सर्व बांधवांनी बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगडावर दर्शनासाठी यावे.”
दुष्काळामुळे मेळावा साधेपणाने
“राज्यात भीषण दुष्काळ असल्याने यंदा कोणताही मोठा राजकीय गाजावाजा किंवा भव्य मेळावा नसेल; अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम होईल. मात्र, वर्षभरातून एकदा सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन गडावर दर्शन घ्यावे, एकमेकांच्या सुख-दुःखाची विचारपूस करावी आणि विचारांची देवाणघेवाण करावी, यासाठी नारायणगडावर एकत्र येण्याचे मी आवाहन करत आहे.” उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की, शासनाने आपल्या चुका दुरुस्त कराव्यात म्हणूनच हा तीन महिन्यांचा वेळ दिला आहे; मात्र जर शासनाने फसवणूक केली, तर पुढील लढा आरपारचा असेल.
—————————-
हेही वाचा…
मराठा आंदोलनातील वाद चव्हाट्यावर: कोणाला किती पॅकेज मिळाले, 2023 पासून चौकशी करा, जरांगे समर्थकांविरोधात ललिता तारख आक्रमक पवित्रा

मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी उपोषण करून महायुती सरकारला अनेकदा जेरीस आणणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी गणेशोत्सपूर्वी 29 ऑगस्ट रोजी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. ते मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर प्रकृती खालावल्याने 20 व्या दिवशी बीडमधील पाटोदा येथे त्यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र, या आंदोलनानंतर जरांगे यांचे सहकारी एकामागून एक अडचणीत सापडत असल्याचे चित्र आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचणार:राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद, ठाकरे बंधूंचा मोर्चा हुकूमशाहीविरुद्ध!; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर चौफेर हल्ला

“केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आक्रोशाचा भडका उडणार आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येत 4 ऑक्टोबरला पुकारलेल्या जनमोर्चाची धग दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि सरकारला ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्येही थेट संवाद सुरू असून, विरोधी पक्षांची ही एकजूट देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे,” असा मोठा खुलासा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी