केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त ‘विशेष सघन पुनरीक्षण’ (SIR) मोहिमेवरून आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दशकांनंतर अत्यंत ऐतिहासिक राजकीय चित्र पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण से
.
संजय राऊत म्हणाले- “आज आमच्या ‘मन की बात'”
पत्रकार परिषदेची प्रस्तावना करताना खासदार संजय राऊत म्हणाले, “आजची पत्रकार परिषद ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या संमतीने आयोजित करण्यात आली आहे. आज खऱ्या अर्थाने आमच्या ‘मन की बात’ मांडायची आहे. देशातील भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात संपूर्ण देशातील पहिला मोठा एल्गार 4 ऑक्टोबरला मुंबईच्या भूमीवरून पुकारला जात आहे. मनसे आणि शिवसेनेच्या नेतृत्वात हा विराट मोर्चा निघत असून, या लढ्याची दिशा स्पष्ट करण्यासाठी दोन्ही नेते एकत्र आले आहेत.”
भायखळा ते पालिका मुख्यालय, ४ ऑक्टोबरच्या मोर्चाची संपूर्ण रूपरेषा
मोर्चाचे नियोजन आणि मार्ग स्पष्ट करताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “येत्या 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता भायखळा येथील ‘रिचर्डसन अँड क्रुडास’ कंपनीच्या आवारातून हा संयुक्त मोर्चा सुरू होईल. साधारणपणे 11 ते 11.30 वाजेपर्यंत मोर्चेकरी एकत्र येतील. तिथून हा मोर्चा मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर पोहोचेल. तिथे व्यासपीठ उभारण्यात आले असून मोर्चाचे रूपांतर एका जाहीर विराट सभेत होईल.”
“या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकणार नाही. सर्वांच्या हातात केवळ तिरंगा असेल. कारण हा प्रश्न देशातील लोकशाही, निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे रक्षण करण्याचा आहे.”
सत्ताधाऱ्यांसह सर्व पक्षांना फोनवरून निमंत्रण
“या मोर्चासाठी आम्ही राज्यातील सर्व राजकीय पक्षांना जाहीर आमंत्रण देत आहोत. सत्ताधारी पक्षातील कोणाला आपल्यासोबत यायचे असेल, तर त्यांचेही स्वागत आहे. कोणालाही औपचारिक पत्र पाठवण्याऐवजी सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांना स्वतः फोन करून थेट संवाद साधला जाईल.”
हा स्पर्धेचा विषय नाही; लोकशाहीसाठी जो रस्त्यावर येईल त्याला आमचा पाठिंबा
विरोधी पक्षांमधील कथित स्पर्धेबाबत विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका मांडली, उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेसने आंदोलन केले, 2 ऑक्टोबरला कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) आंदोलन होत आहे आणि 4 ऑक्टोबरला आम्ही रस्त्यावर उतरत आहोत. या आंदोलनांमध्ये कसलीही चढाओढ किंवा स्पर्धा नाही. मुद्दा लोकशाहीचा आहे. उद्या एखाद्या सोसायटीतील नागरिकांनी जरी बाहेर पडून निवडणूक आयोगाचा निषेध केला तरी ते योग्यच आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने जनजागृती करणे काळाची गरज आहे.”
“2 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला आमचा पूर्ण आणि जाहीर पाठिंबा आहे. यापूर्वी जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनालाही आम्ही पाठिंबा दिला होता. लोकशाही वाचवण्यासाठी जो कोणी मैदानात उतरेल, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू. सगळ्यांनी आपापल्या स्तरावर जनतेला जागे करावे. यानंतरही जर निवडणूक आयोगाने आपली मनमानी थांबवली नाही, तर सर्वांना एकत्र घेऊन सरकारवर एक जोरदार ‘भीमटोला’ लगावू.”
आता विषय SIR आणि मतदारांच्या अपमानाचा
पत्रकारांनी उपस्थित केलेल्या राजकीय मुद्द्यांवर बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. “आम्ही रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून, मेहनत घेऊन लोकांचे प्रश्न मांडतो. पण शेवटी मतदार यादीत बोगसगिरी आणि मॅनिपुलेशन करून मतदारांच्या मतांची चोरी केली जात असेल, तर हा जनतेचा आणि लोकशाहीचा घोर अपमान आहे. आजचा लढा हा केवळ आणि केवळ ‘एसआयआर’ आणि देशातील निवडणूक व्यवस्थेतील गैरकारभाराविरुद्ध आहे.”
ईव्हीएमबाबत जुनी भूमिका
“2017-18 मध्ये मी स्वतः ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. 4 ऑक्टोबरच्या मोर्चानंतर या लढ्याची पुढील राष्ट्रीय रूपरेषा ठरवली जाईल.”
संवादावरून संजय राऊतांचा खुलासा; उद्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक
पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यातील संवादावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला. “मी कोणत्याही एका नेत्याबद्दल वैयक्तिक वक्तव्य केलेले नाही. माझा मुद्दा असा होता की, आज देशातील लोकशाही संकटात असल्याने सर्वच विरोधी पक्ष एकमेकांच्या संपर्कात आहेत आणि संवाद साधत आहेत. या व्यापक लढ्यासाठी स्वतः राज ठाकरे पुढाकार घेत आहेत.”
दरम्यान, उद्या (बुधवारी) देशपातळीवर ‘इंडिया’ आघाडीची महत्त्वाची बैठक होणार असून, निवडणूक आयोगाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय पातळीवर पुढील रणनीती काय असेल, यावर त्या बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले. ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावर येऊन निवडणूक आयोगाविरुद्ध रणशिंग फुंकल्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष आता 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत निघणाऱ्या या महामोर्चाकडे लागले आहे.
——————————–
हेही वाचा…
आंदोलनाची धग दिल्लीपर्यंत पोहोचणार: राज ठाकरे-राहुल गांधींमध्ये संवाद, ठाकरे बंधूंचा मोर्चा हुकूमशाहीविरुद्ध!; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर चौफेर हल्ला

“केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून लोकशाहीची गळचेपी करणाऱ्या मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात देशभरात आक्रोशाचा भडका उडणार आहे. ठाकरे बंधूंनी एकत्र येत 4 ऑक्टोबरला पुकारलेल्या जनमोर्चाची धग दिल्लीपर्यंत पोहोचेल आणि सरकारला ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावाच लागेल. राज ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामध्येही थेट संवाद सुरू असून, विरोधी पक्षांची ही एकजूट देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी आहे,” असा मोठा खुलासा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी