![]()
केतन अग्रवाल खून प्रकरणात सिया गोयल हिने घटनेपूर्वीच्या 15 दिवसांत केतनसोबत दोन वेळा लोहगड किल्ल्यावर फिरण्याच्या बहाण्याने भेट दिली होती. त्यानंतर पुन्हा केतनला किल्ल्यावर नेल्यास त्याचे कुटुंबीय त्याला लोहगडावर जाण्यास परवानगी देणार नाहीत, याची आरोपींना जाणीव होती. त्यामुळे सियाच्या एका मैत्रिणीच्या फोटोचा गैरवापर करून ‘माही जे’ नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करण्यात आले. या खात्याद्वारे केतनशी सियाची मैत्रीण असल्याचे भासवत संपर्क साधला. त्यानंतर सियाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी लोहगड किल्ल्यावर ‘सरप्राइज बर्थडे पार्टी’ देण्याच्या बहाण्याने केतनला तेथे येण्यास भाग पाडले आणि त्याचा खून केल्याचा दावा मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबात केला आहे. ज्या तरुणीचा फोटो ‘माही’ नावाने वापरण्यात आला, ती नेल आर्टिस्ट आहे. घटनेच्या वेळी तिचा पती अमली पदार्थाच्या गुन्ह्यात पोलिसांच्या अटकेत होता. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपींनी तिला धमकावले. पती तुरुंगातून सुटल्यानंतर पोलिसांना सांगितला प्रकार संबंधित मैत्रिणीचा पती तुरुंगात असल्याने आणि तिचे बाळ लहान असल्याने सियाने सांगितलेल्या गोष्टींची माहिती असूनही ती शांत राहिली. मात्र केतनचा खून झाल्याचे समजल्यानंतर तिने तिच्या आईशी चर्चा केली. त्यानंतर तिने पोलिसांत जबाब दिला. सियाला केतनने 28 महागडे ड्रेस दिले- विशाल अग्रवाल केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सिया आणि चेतन यांच्या संभाषणात ते एकमेकांना पती-पत्नी तसेच ‘हबी-वाइफी’ म्हणत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच त्यांनी एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्यादेखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्यांचे यापूर्वीच लग्न झाल्याचे दिसून येत आहे. केतन याच्याशी लग्न ठरल्यावर सिया हिला 28 महागडे ड्रेस आणि लाखो रुपयांचे सोन्याचे दागिन्यांचे चार ते पाच सेट दिले. केतनने पाठीवर सिया नाव कोरले होते सियाची एक बहीण दहावीमध्ये असताना तिच्या क्लासमध्ये सिया जायची. या वेळी गणेशशी (नाव बदलले आहे) ओळख झाली होती. त्यानंतर त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले होते. एक वर्षभर त्यांचे प्रेमसंबंध होते. त्यातच सियाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आणखी अरुण (नाव बदलले आहे) या तरुणाशी ओळख झाली. त्यांच्यात चॅटिंग होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. या सर्वांचा पोलिसांनी जबाब घेतला आहे.
Source link
केतन अग्रवाल खून:फेक अकाउंटसाठी मैत्रिणीचा वापर, तिलाही दिली धमकी, सिया, चेतनने घेतला मैत्रीचा गैरफायदा