![]()
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने ओढ दिल्याने राज्यभरात शेती पिके हातून गेली असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्य सरकारने नुकताच कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, आता राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार असल्याचा मोठा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे. या परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले असले, तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. कुठे कोसळणार परतीचा पाऊस? हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत परतीचा पाऊस जोरदार हजेरी लावेल. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासह पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वदूर पाऊस नसला, तरी काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामानात नेमके काय बदल होत आहेत? सध्या ईशान्य बंगालच्या उपसागरात आणि आग्नेय बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे, मान्सूनने दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांतून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र राज्यासह मुझफ्फरनगर, अलीगड, चंदीगड आणि उदयपूर परिसरात मान्सून अजूनही कायम आहे. एल-निनोचा फटका आणि रब्बीवर संकट प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या ‘एल-निनो’चा थेट फटका यंदा भारताच्या मान्सूनवर पडला आहे. हवामान विभागाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यंदा देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ८७ टक्के, तर महाराष्ट्रात ८१ टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनोत्तर हंगामातही देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. पावसाअभावी खरिपाची पिके वाया गेली असतानाच, आता रब्बी हंगामावरही मोठे संकट उभे राहिले आहे. याशिवाय, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राज्यासमोर ‘आ वासून’ उभा आहे. तज्ज्ञांच्या मते, २०२७ मध्ये एल-निनोचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, हवामानातील या टोकाच्या बदलांमुळे भविष्यात मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. ————– ही बातमी पण वाचा.. मान्सूनचा निरोप, पण भारतातील 51% भाग दुष्काळग्रस्त: कुठे 17 वर्षांतील सर्वात कमी, कुठे 20 वर्षांतील सर्वाधिक पाऊस; कोणते संकट उभे राहणार 2026 चा मान्सून थोडा अनोखा आहे. कागदावर जरी सामान्य सरासरीपेक्षा केवळ 13% कमी पाऊस दिसत असला, तरी देशातील 51% भागात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. कुठे 20 वर्षांतील सर्वाधिक पाऊस झाला, तर कुठे 17 वर्षांतील सर्वात कमी. मान्सूनच्या माघारीसोबत 4 महिन्यांच्या पावसाचा संपूर्ण लेखाजोखा आणि आपल्या जीवनावर झालेल्या परिणामांची संपूर्ण कहाणी… सविस्तर वाचा
Source link
राज्यात परतीच्या पावसाचा इशारा:कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम