Headlines

शिरूरमध्ये लाच मागितल्याप्रकरणी दोन हवालदारांवर कारवाई:एकाला 11 हजार रुपये घेताना पकडले, दुसरा 95 हजार घेऊन फरार




दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करता मदत करण्यासाठी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांत शिरूर पोलिस ठाण्यातील दोन हवालदारांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. शिवाजी ज्योतीराम बनकर यांना 11 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले, तर सतीश नाथाराम मुंढे हे 95 हजार रुपये स्वीकारल्यानंतर सापळ्याची चाहूल लागल्याने रक्कम घेऊन पळाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले आहे. पहिल्या प्रकरणातील 29 वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या आईवडिलांविरुद्ध 19 ऑगस्ट 2026 रोजी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास हवालदार बनकर करीत होते. तक्रारदार व त्यांच्या आईवडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी, तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी बनकर यांनी 15 हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पैसे दिल्याशिवाय नोटीस देणार नसल्याचेही त्यांनी सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. यासंदर्भात तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याच दिवशी जुन्या शिरूर पोलिस ठाण्यात करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न झाल्याचे विभागाने सांगितले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलिस ठाण्याबाहेर रस्त्याच्या कडेला तक्रारदाराकडून 11 हजार रुपये स्वीकारताना बनकर यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दुसऱ्या प्रकरणात 59 वर्षीय तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होता. या गुन्ह्याचा तपास हवालदार सतीश मुंढे यांच्याकडे होता. अटक टाळण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी त्यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने व विभागाकडे धाव घेतली. पडताळणीदरम्यान मुंढे यांनी तक्रारदाराला टाकळी हाजी पोलिस चौकीत बोलावले. स्वतःसाठी व वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला एक लाख रुपये आणि तडजोडीनंतर 95 हजार रुपयांची मागणी केल्याचे पंचांसमक्ष निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच दिवशी चौकीत रचलेल्या सापळ्यात मुंढे यांनी 95 हजार रुपये स्वीकारले. मात्र, पथकाची चाहूल लागताच ते स्वीकारलेली रक्कम घेऊन अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याचे विभागाने स्पष्ट केले. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम 238 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. बनकर प्रकरणातील कारवाई पोलिस निरीक्षक आसावरी शेंडगे, तर मुंढे प्रकरणातील कारवाई पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकांनी केली. दोन्ही कारवायांचे पर्यवेक्षण पोलिस उपअधीक्षक सतीश वाळके यांनी केले. लाच मागणीसंबंधी तक्रारी असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *