![]()
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत सफाई मित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार व आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सफाई कर्मचारी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योती गाडे व आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वच्छतादूत सुरेश खामकर, डॉ. अमोल बागुल, घनकचरा विभागप्रमुख रामदिन उपस्थित होते. महापौर म्हणाल्या, सफाई कर्मचारी हे शहरातील नागरिकांचे खऱ्या अर्थाने आरोग्यदूत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची पर्वा न करता ते पहाटेपासून शहराच्या स्वच्छतेचे काम करतात. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मोठी मदत होते. शहराची स्वच्छता राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्यही सुदृढ व निरोगी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार करण्यात आले आहेत. सफाई कर्मचारी निरोगी राहिले तर त्याचा सकारात्मक परिणाम शहरातील नागरिकांच्या आरोग्यावरही होईल. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. आयुक्त डांगे म्हणाले, महानगरपालिकेत सुमारे ७०० सफाई कर्मचारी काम करीत असून शहराच्या स्वच्छतेवर सुमारे ९ कोटी रुपये खर्च होत आहेत. आपण काम करीत असताना शहराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांचे समाधान होणे गरजेचे आहे. स्वच्छता विभागाला अजूनही स्वच्छतेच्या कामावर मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याने १०० टक्के योगदान द्यावे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांची एक्स-रे, रक्तदाब, शुगर आणि रक्त तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार मोफत औषधोपचार व औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिराच्या निमित्ताने सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. व्यसने आणि खासगी सावकारापासून दूर राहा महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनांचे प्रमाण असल्याचे तसेच काही कर्मचारी खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेत असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी नमूद केले. खासगी सावकारांकडून कर्ज घेतल्यानंतर काही वेळा कर्मचाऱ्यांकडून बँकेचे पासबुक किंवा क्रेडिट कार्ड ताब्यात घेतले जाते आणि पगार झाल्यानंतर व्याजासह रक्कम काढून घेतली जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी व्यसनांपासून तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेण्यापासून दूर राहावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.
Source link
सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुदृढ राहणे आवश्यक- महापौर:मनपा सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी, कर्मचाऱ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन