![]()
विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करताना श्रम, वेळ आणि बुद्धी यांचा समन्वय साधून यश संपादन केले पाहिजे. परिस्थितीतील अभावाचे कारण देऊन प्रयत्नांपासून दूर पळणे अयोग्य आहे. विद्यार्थ्यांनी गरिबीचे भांडवल न करता जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या जोरावर आपले ध्येय साध्य करावे, असा सल्ला राज्य गुप्तवार्ता विभाग संभाजीनगरचे पोलिस उपायुक्त सुनील कृष्णा लांजेवार यांनी दिला. पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात कै. खंडेराव पाटील शिसोदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मार्गदर्शन व गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. लांजेवार यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध दिनचर्येचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित केले. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील शिसोदे, संचालक श्रीधरराव पाटील शिसोदे, विजयकुमार पाटील शिसोदे, सुशील पाटील शिसोदे, प्राचार्य एस. जी. सोनकांबळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्राचार्य एस. जी. सोनकांबळे यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन डॉ. हंसराज जाधव यांनी तर डॉ. नूतन जोनवाल यांनी आभार मानले. सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्याला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी विद्यार्थी जनार्दन नवसागर यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रसेन कोठावळे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात खंडेराव पाटील शिसोदे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा फुंकली. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या १९६५ मधील पहिल्या बॅचचे विद्यार्थी जनार्दन नवसागर हे अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील विविध आठवणींना उजाळा देत जुन्या स्मृती ताज्या केल्या. यावेळी प्राध्यापकांची उपस्थिती होती.
Source link
पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयात खंडेराव पाटील शिसोदे यांचा स्मृतिदिन:प्रतिकूल स्थितीवर मात करत यश मिळवा; गरिबीचे भांडवल करू नये- सुनील लांजेवार