Headlines

शेतकऱ्यांना मदत न केल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही:खासदार कल्याण काळे यांचा प्रशासनाला इशारा‎




मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ हेक्टरी एक लाख रुपयांची सरसगट मदत जाहीर करावी. अन्यथा, सत्ताधारी मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिला. तालुक्यातील रेलगाव येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने दुष्काळी पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. पाहणीनंतर खासदार काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात आणि पत्रकारांशी बोलताना डॉ. काळे म्हणाले, “यंदा १९७२ च्या दुष्काळापेक्षाही बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पदरचे पैसे लावून खरिपाची पेरणी केली, मात्र पावसाने दगा दिल्याने पिके करपून गेली आहेत. शेतात काहीच उगवले नसल्याने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास ७ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येईल, असेही खासदार काळे यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्याप्रसंगी दूध संघाचे संचालक संदीप बोरसे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे, जगन्नाथ काळे, सुदाम मते, रेखा वाहटूळे, ज्ञानेश्वर मते, गणेश काळे, अंबादास गायके, बाबूराव डकले, सदाशिव विटेकर व शेतकरी उपस्थित होते. निवेदनातील मुख्य मागण्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी. जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या उभारण्यात याव्यात. सर्व शेतकऱ्यांचे थकीत कर्ज पूर्णपणे माफ करून कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे. पिकांचा विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावा. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून रोहयोची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *