![]()
तालुक्यात आधीच दुष्काळाच्या तीव्र झळा बसत असताना, त्यातच महावितरणकडून होणाऱ्या अपुऱ्या आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. या गलथान कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कन्नड येथील महावितरण उपविभागीय कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात आली. संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत उपविभागीय अभियंत्यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन देऊन प्रशासनाचा अनोखा निषेध नोंदवला. तालुक्यात यंदा सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बँक आणि खासगी सावकारांचे कर्ज काढून शेतकऱ्यांनी खरिपाची लागवड केली होती. मात्र पावसाच्या खंडामुळे पिके कोमेजून गेली आहेत. अशा बिकट परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी किंवा शेततळ्यात थोडेफार पाणी उपलब्ध आहे, ते वीज नसल्यामुळे पिकांना देता येत नाही. महावितरणच्या लहरी कारभारामुळे उभ्या बागा व पिके जळून खाक होत आहेत. या निदर्शनांप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सदस्य कृषिभूषण भाऊसाहेब थोरात यांनी महावितरणच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. ‘शेतकरी दुष्काळाशी दोन हात करत असताना महावितरणकडून जणू त्यांची अडवणूक सुरू आहे,’ असा आरोप त्यांनी केला. आंदोलनादरम्यान उपविभागीय अधिकारी वाघचौरे व सहायक अभियंता राठोड हे निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित नव्हते. वाघचौरे छत्रपती संभाजीनगर येथे बैठकीसाठी गेल्याचे सहायक अभियंता मनीष अंभोरे यांनी सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आर. पी. वाघचौरे यांच्या रिकाम्या खुर्चीलाच निवेदन टेकवले. येत्या चार दिवसांत बंद पडलेल्या सर्व डीपी सुरू करून अखंडित वीजपुरवठा बहाल न केल्यास महावितरणच्या उपविभागीय कार्यालयाला कायमचे कुलूप ठोकण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याप्रसंगी दिनकर पवार, कृष्णा साबळे, प्रकाश बोरसे, रामेश्वर भुसारे, शिवाजी बचाटे, राजू बोंगाणे, दीपक शेजवळ, निसार पठाण, नंदकुमार काळे, वाल्मीक शिरसे, सचिन गायके आदींची भाषणे झाली. ‘डीपी’ दुरुस्तीसाठी प्रतीक्षा टापरगाव येथील जुन्या वॉटर सप्लायजवळील ट्रान्सफॉर्मर (डीपी) गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या मोसंबीच्या बागा वाळल्या आहेत, अशी व्यथा कृष्णा मोहिते, पुरुषोत्तम मोहिते व विजय मोहिते यांनी मांडली. तर, ‘डीपी जळाल्यानंतर ती दुरुस्त होऊन येण्यासाठी महिना-महिना ताटकळत राहावे लागते,’ असा संताप माळीवाडा येथील दीपक शिरसे, नंदकुमार शिरसे व गणपत खरे यांनी व्यक्त केला.
Source link
खंडित वीजपुरवठ्याविरोधात कन्नड महावितरण कार्यालयासमोर निदर्शने:दुष्काळाच्या झळा, त्यात खंडित वीजपुरवठा