Headlines

पुण्यातील चित्रकार रमेश थोरात यांना राष्ट्रीय ललित कलाअकादमी पुरस्कार प्रदान:सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते नवी दिल्लीत गौरव; दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह मिळाले




नवी दिल्ली येथे झालेल्या ६५व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनात पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार रमेश विठ्ठल थोरात यांना ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. समकालीन दृश्यकलेतील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत झाले. ६५व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी देशभरातील २ हजार ४९५ कलाकारांकडून ६ हजार १७५ कलाकृती प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २७० कलाकृतींची प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली. यामधून २० कलाकृती पुरस्कारासाठी निवडण्यात आल्या. पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि अंगवस्त्र असे आहे. रमेश थोरात यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून, भारतासह परदेशातही त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरविण्यात आली आहेत. त्यांच्या कलाकृती विविध कला संग्रहांमध्येही स्थान मिळवून आहेत. थोरात यांच्या चित्रनिर्मितीत माती, सूर्यकिरणांचा पोत, भक्तिभावाची चिन्हे, गूढ विचार आणि आध्यात्मिक अनुभूती यांचा प्रभाव प्रकर्षाने जाणवतो. विचार आणि रंगांचे अनेक थर संयमाने चढवत ते चित्राला आध्यात्मिक परिणाम देतात. त्यांच्या चित्रांमध्ये पारंपरिक अर्थाने कथा किंवा वास्तववादी विषय मांडलेले नसून, अंतर्मनातील भावनिक आणि आध्यात्मिक स्थित्यंतरे अभिव्यक्त होतात. केंद्रबिंदू, अंकुर, अंतर्मनातील ऊर्जा, पात्र आणि पोत यांतील स्पंदने ही त्यांच्या चित्रांची वैशिष्ट्ये मानली जातात. प्रत्येक कलारसिकाला त्यांच्या कलाकृतीतून स्वतंत्र वैचारिक अर्थ शोधता यावा, या भूमिकेतून त्यांच्या चित्रांना नावे दिली जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक कलाकृती पाहणाऱ्याला स्वतःच्या अनुभवातून तिचा अर्थ उलगडण्याची संधी देते. दीर्घ साधना, चिंतन आणि रंगांच्या माध्यमातून आध्यात्मिक अनुभूती व्यक्त करणाऱ्या थोरात यांच्या कलाप्रवासातील राष्ट्रीय पुरस्कारामुळे पुण्याच्या कला क्षेत्रातही आनंद व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *