![]()
पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहरा जवळील लिंब खिंड परिसरात कासवाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना सातारा तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ५० हजार रुपये किमतीचे इंडियन सॉफ्टशेल टर्टल जातीचे कासव आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. लिंब खिंड परिसरात वन्यजीवाची विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. पोलिस हवालदार राजू शिखरे यांना मिळालेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला.
संशयित कासव घेऊन परिसरात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रज्वल विजय सावंत, केतन विनोद जाधव यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांचा त्यात समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून काळपट रंगाचे इंडियन सॉफ्टशेल टर्टल जातीचे कासव मिळून आले. कासवाच्या वाहतुकीसाठी वापरलेल्या दोन दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या. जप्त करण्यात आलेले कासव कुठून आणले होते, त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती तसेच या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. वन्यजीव तस्करीच्या साखळीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सी. एस. पाटील करीत आहेत.
Source link
कासव विक्रीच्या प्रयत्नाला पोलिसांचा ब्रेक:लिंब खिंडीत कारवाई; दोन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात, कासव व दोन दुचाकी जप्त