![]()
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी 14 उमेदवारांनी एकूण 15 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत 49 उमेदवारांनी 74 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. दरम्यान, चार दिवसांत तब्बल 441 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. त्यामुळे गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. बुधवारी जिल्हा बँकेच्या विविध मतदारसंघांतून इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. कराड तालुका विकास सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष मतदारसंघातून उदयसिंह विलासराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. खंडाळा मतदारसंघातून राजेंद्र यशवंत नेवसे यांनी उमेदवारी अर्ज भरला. माण तालुक्यातून मनोजकुमार सदाशिवराव पोळ यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली. गृह निर्माण व दूध संस्था मतदारसंघातून ज्ञानेश्वर कोंडीबा पवार यांनी अर्ज दाखल केला. विजाभज राखीव मतदारसंघातून अशोक पांडुरंग काकडे, दिनकर शंकर शिरतोडे आणि शकुंतला वसंतराव साबळे यांनी उमेदवारी अर्ज भरले. इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघातून सुभाष धनाजी नरळे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. नागरी बँका, नागरी सहकारी पतपेढ्या, ग्रामीण बिगरशेती संस्था तसेच पगारदारांच्या पतसंस्था मतदारसंघातून राजेश विलासराव पाटील आणि मनोजकुमार सदाशिवराव पोळ यांनी अर्ज दाखल केले. महिला राखीव मतदारसंघातून ऋतुजा राजेश पाटील आणि पुष्पा धनंजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरले. अनुसूचित जाती-जमाती राखीव मतदारसंघातून रवींद्र सर्जेराव बडेकर यांनी अर्ज दाखल केला. कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून अतुल सुरेश भोसले यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. 49 उमेदवारांचे 74 अर्ज आतापर्यंत 49 उमेदवारांनी 74 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. काही उमेदवारांनी एकाच मतदारसंघातून एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले आहेत, तर काही इच्छुकांनी वेगवेगळ्या मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज भरल्याचे चित्र आहे. त्यामुळे दाखल झालेल्या अर्जांची संख्या आणि प्रत्यक्ष निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या यामध्ये फरक राहणार आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक विभागाकडून अर्जांची छाननी केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर प्रत्येक मतदारसंघातील प्रत्यक्ष लढतीचे चित्र स्पष्ट होईल. अंतिम दिवशी इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार (दि. 1) हा अंतिम दिवस आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. आतापर्यंत 441 अर्जांची विक्री झाल्याने अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. प्रमुख राजकीय गटांतील काही इच्छुकांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नसल्याने त्यांची भूमिका गुरुवारी स्पष्ट होणार आहे. अंतिम दिवशी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता केवळ उमेदवार किंवा सूचक यांनीच निवडणूक कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. समर्थक आणि इतर सोबत्यांनी निवडणूक कार्यालयात गर्दी करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दिग्गजांच्या उमेदवारीकडे लक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील विविध गट आणि राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. आतापर्यंत 74 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली असली तरी काही प्रमुख इच्छुकांनी अद्याप अर्ज दाखल केलेले नाहीत. त्यामुळे गुरुवारी कोणकोणते उमेदवार अर्ज दाखल करतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर अर्जांची छाननी होईल. त्यानंतर माघारीच्या टप्प्यात अनेक मतदारसंघांतील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असले तरी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात कोण राहणार आणि कोण माघार घेणार, हे पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे. हेही वाचा… प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया:म्हणाल्या, ‘बिनबुडाचे आरोप, पोलिस चौकशीत सत्य समोर येईल’ शिवसेना ठाकरे पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. पूर्णेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी पूर्णेकर यांचा जुना मित्र पप्या शिंदे याला अटक केली असून, आणखी 4 आरोपी फरार असल्याची माहिती आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. सविस्तर वाचा…
Source link
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीला वेग:चार दिवसांत 74 अर्ज दाखल, अंतिम दिवशी गर्दीची शक्यता