![]()
ठाण्यातील शिवसेना (उबाठा) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येनंतर ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. पूर्णेकर यांच्या हत्येमागे राजकीय सूड आणि बिल्डर लॉबी असल्याचा गंभीर आरोप करत राऊत यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. याशिवाय राज्यातील दुष्काळ आणि शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. पूर्णेकरांच्या हत्येमागे बिल्डर लॉबी अन् ड्रग्ज रॅकेट? प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येबाबत बोलताना राऊत म्हणाले की, “पूर्णेकर यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यांचा राजकीय संघर्ष एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासोबत होता. मनोरमा नगर भागात बिल्डर लॉबी आणि ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्यांच्या माध्यमातून स्थानिक लोकांना बेघर करण्याचे कटकारस्थान सुरू आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली सुरू असलेल्या या मनमानी आणि अन्यायाविरुद्ध पूर्णेकर ठामपणे लढत होते, म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली.” गृहमंत्र्यांवर निशाणा आणि पोलीस आयुक्तांच्या हकालपट्टीची मागणी ठाण्यातील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवत राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. “एका राजकीय पदाधिकाऱ्याची अत्यंत निर्घृण हत्या होते, याची लाज गृहमंत्र्यांना वाटायला हवी. हे सरकार पूर्णपणे निर्ढावलेले आहे. ठाणे शहरात गेल्या एका महिन्यात तब्बल ५ हत्या झाल्या असून त्यात एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या छत्रछायेखालीच शहरात गुंडगिरी, खंडणी आणि ड्रग्ज रॅकेट फोफावत आहे,” असा घणाघाती आरोप राऊत यांनी केला. तसेच, ठाण्यात १२-१३ वर्षे एकाच जागी ठाण मांडून बसलेले पोलीस अधिकारी कोणाच्या आशीर्वादाने तिथे आहेत? असा सवाल करत ठाणे पोलीस आयुक्तांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी केली. दुष्काळ आणि शक्तीपीठ महामार्गावरून हल्लाबोल राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रावर दुष्काळाचे मोठे संकट असताना सरकारच्या तिजोरीत मात्र खडखडाट आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारला ४० हजार कोटींचे कर्ज काढावे लागत आहे, आणि दुसरीकडे मंत्री केवळ दौऱ्यांचे नाटक करत आहेत.” तसेच, प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत राऊत यांनी हा महामार्ग तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. “हा महामार्ग केवळ ठेकेदारांच्या माध्यमातून मंत्र्यांना ४० टक्के कमिशन (हजारो कोटी रुपये) मिळवण्यासाठीच आखण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून तो पैसा दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी वापरावा,” अशी आग्रही मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला पाठिंबा यावेळी राऊत यांनी शिवाजी पार्कवर आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्या भूमिकेचे समर्थन केले. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी दिपके करत होते. मात्र, लोकशाही आणि संविधान विरोधी असलेल्या भाजपच्या लोकांनी त्यांना विरोध केल्याचा आरोपही राऊत यांनी केला. ——————— ही बातमी पण वाचा.. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण: ठाकरे गटाच्या आक्रमक पवित्र्यानंतर संशयितांची नावे जबाबात; हजारो समर्थकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप, मुलाची भावुक पोस्ट शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद बुधवारी शहरात उमटले. जे. जे. रुग्णालयातून पूर्णेकर यांचे पार्थिव कापूरबावडी पोलिस ठाण्यात आणल्यानंतर कुटुंबीय आणि हजारो समर्थकांनी तिथेच आक्रोश करत आंदोलन सुरू केले. या कठीण प्रसंगात प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम याने इन्स्टाग्रामवर वडिलांसोबतचा एक फोटो पोस्ट करून केवळ ‘पप्पा’ असे कॅप्शन देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. सायंकाळी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत पूर्णेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
पूर्णेकरांच्या हत्येमागे बिल्डर लॉबी-ड्रग्ज रॅकेटचा संशय:संजय राऊतांचा सरकारवर निशाणा, ठाणे पोलिस आयुक्तांना हटवण्याची मागणी