Headlines

गाडसिंबावासियांचा पुढाकार:कोरकू भाषिक आशा सेविकांच्या नियुक्तीसाठी आदिवासींचा ठिय्या, सीईओंनी जमिनीवर बसून केली मागणी मान्य‎




भाषेच्या अडचणीमुळे रुग्णांशी होणारा संवाद खंडित होऊ नये. त्यासाठी स्थानिक कोरकू भाषा येणाऱ्या महिलांनाच मेळघाटात ‘आशा सेविका’ म्हणून नियुक्त करावे. या मागणीसाठी आज, गुरुवार, १ ऑक्टोबरला मेळघाटातील शेकडो आदिवासी महिला व तरुणांनी लहान बाळांसह जिल्हा परिषदेत धडक देऊन ठिय्या आंदोलन छेडले. चिखलदरा तालुक्यातील गाडसिंबावासियांनी त्यासाठी पुढाकार घेतला. दयाराम बेलसरे, अनिकेत मावस्कर या दोन तरुणांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पहिल्यांदा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन झाले. त्यांच्या बोलण्याने समाधान न झाल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या कक्षासमोर ठिय्या देण्यात आला. अशाप्रकारे तब्बल तीन तास आंदोलन चालले. शेवटी सीईओंनी स्वतः कक्षाबाहेर येत थेट जमिनीवर बसून आदिवासींशी संवाद साधला. त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या. मेळघाटातील बहुतांश ग्रामीण व दुर्गम भागात कोरकू भाषक आदिवासी समाज राहतो. त्यामुळे त्यांची भाषा न समजणाऱ्या आशा सेविकांसोबत गाववासियांचा योग्य संवाद होत नाही. स्थानिक महिलांनासुद्धा वैद्यकीय समस्या, गरोदरपणातील काळजी आणि बालकांच्या उपचाराबाबत आरोग्य सेविकांशी संवाद साधणे कठीण जाते. त्यामुळे मेळघाटात आशा सेविकांची भरती करताना स्थानिक कोरकू भाषेचे ज्ञान असणाऱ्या महिलांना प्राधान्य द्यावे. ही आंदोलनकर्त्यांची मागणी होती. शेवटी शासन निर्णयानुसार उच्चशिक्षितांना प्राथमिकता द्यावी की स्थानिक भाषा येणाऱ्यांना नियुक्त करावे, याबाबत लगेच शासनाकडून मार्गदर्शन मागविले जाईल. तोपर्यंत आधीच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचे आदेश सीईओंनी दिले आहेत. सीईओंच्या अशा लेखी व प्रत्यक्ष आश्वासनानंतर आदिवासी महिला व तरुणांनी समाधान व्यक्त करत आपले आंदोलन मागे घेतले. आंदोलनाची तीव्रता मोठी होती. मेळघाटातील विविध दुर्गम भागांतून आलेल्या महिला आपल्या तान्ह्या बाळांना कडेवर घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. संतप्त आदिवासी तरुण आणि महिलांनी जिल्हा परिषदेच्या आवारात आणि मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासकीय कोंडी, पण सीईओंची हातोटी कामी सुमारे तीन तास डीएचओ व सीईओ यांच्या कक्षाबाहेर आंदोलन सुरू राहिल्याने प्रशासकीय कामकाज काही काळ ठप्प झाले होते. आंदोलक तेथे पोहोचले त्यावेळी सीईओ जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात एका बैठकीत व्यग्र होते. शेवटी ते त्वरेने जिल्हा परिषदेत पोहोचले. त्यांनी कोणत्याही प्रोटोकॉलची पर्वा न करता थेट जमिनीवर बसून आंदोलकांशी चर्चा केली. त्यांच्या या संवेदनशील आणि आदरयुक्त वर्तनामुळे वातावरणातील तणाव निवळला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *